मध्य रेल्वेमध्ये मराठी अभिजात भाषा विभाग तत्काळ स्थापन करा, रेल कामगार सेनेची नवनियुक्त महाव्यवस्थापकांकडे मागणी

मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात मराठी अभिजात भाषा विभाग तत्काळ सुरू करण्यात यावा, त्या माध्यमातून रेल्वे प्रशासनात मराठीचा अधिक वापर व्हावा, रेल्वे कर्मचारी-अधिकाऱ्यांना मराठीचे पुरेसे ज्ञान देण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्याकडे केली आहे. तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर महाव्यवस्थापकांशी सकारात्मक चर्चा झाली.

शिवसेना नेते आणि रेल कामगार सेना अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना वारकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल-रखुमाईची विलोभनीय मूर्ती भेट देण्यात आली. यावेळी मराठी राजभाषा विभाग स्थापनेच्या मुद्द्यावर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेमध्ये मराठी राजभाषा विभाग स्थापन करण्याबाबत रेल्वे प्रशासनाला यापूर्वी पत्र दिले आहे. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याची मागणी रेल कामगार सेनेतर्फे करण्यात आली. तसेच लैसिक ऑपरेशन, रनिंग स्टाफवरील अन्याय, रनिंग स्टाफवर कॅमेयाद्वारे पाळत ठेवणे, स्पॅड केसेस-शिक्षेला विरोध, इंजिनीअरिंग विभागातील 10 टक्के आणि 40 टक्के कोटा रिलीज करणे, टीएमडब्ल्यू वर्कशॉपसाठी स्वतंत्र सीडब्ल्यूएम आदी विषय चर्चेत घेण्यात आले. यावेळी महिला आघाडी सरचिटणीस सोनाक्षी मोरे, मंजुषा माटे, सुषमा गुजर, कोमल माळवे, नरेश बुरघाटे, ललित मुथा, प्रशांत कमानकर, तुकाराम कोरडे, नीलेश कदम, संतोष देवळेकर, सी.आर.राजन, राजेश भगत, सुनील लाड, राजेश कोकाटे, रवी सावंत, कृष्णा रंशूर, दत्ता राव, तिरुमलेश अंबाला, स्वप्नील मयेकर, नीलेश मोरे, लजेश कोरगावकर, अनिरुद्ध, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.