
मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांच्या गेल्या वर्षीचा रखडलेला बोनस तातडीने द्या आणि त्यांना देण्यात येणाऱया 15 दिवसांच्या अर्जित रजा लागू करा, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक यांच्याकडे केली.
मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत रुग्णालये विभागातील केईएम, नायर, शीव, जीटीबी (क्षयरोग) रुग्णालयामध्ये 2009-10 पासून रोजंदारी आणि 2016-17 पासून बहुउद्देशीय कामगार तसेच एप्रिल 2017 पासून सीटीसी-पीएचओ बीएमटी सेंटर, बोरिवली येथे कामगार, कर्मचारी चतुर्थश्रेणी पदावर कायम कामगार अशा सुमारे 200 कामगारांनी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांची भेट घेऊन केली. यावेळी उपाध्यक्ष मुकेश करोतीया, अनिल निरभवने, अनिल वायदंडे, तानाजी पाटील, प्रफुल्ल अहिरे, विनोद जाधव यांच्यासह मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते. दरम्यान, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन अंद्राडे यांनी दिले.