विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा, महाराष्ट्र कामगार सेनेचे निवेदन

सोलापुरातील विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी देण्यात यावी; अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक कामगार आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सोलापुरातील विडी उद्योगात काम करणाऱया 60 ते 70 हजार कामगारांना कारखानदारांकडून किमान केतन दिले जात नाही. शासनाने विडी कामगारांसाठी जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही. शासनाच्या आदेशानुसार 350 रुपयांप्रमाणे मजुरीदर 1 हजार विडीमागे द्यावा लागतो. पण, प्रत्यक्षात 200 रुपये 1 हजार विडीमागे मजुरी देतात.

यापूर्वी 1998 ते 2015 पर्यंत कामगारांच्या संमतीने कामगार संघटनेने तडजोडीने मजुरी देण्याचा करार केला होता. त्या कराराची मुदत संपून 7 वर्षे होत आहेत. मागील कराराच्या आधारे कामगारांना मजुरी देतात. मात्र, सोलापूर विडी उद्योग संघ विडी कामगारांना मजुरीवाढ केल्याचे जाहीर करून कामगार व शासनाची दिशाभूल करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पद्मावती द्याकंनपल्ली, रेखा आडकी, लक्ष्मीबाई इप्पा, शोभा पोला, पप्पू शेख, किठ्ठल कुऱ्हाडकर, गुरुनाथ कोळी, मुनीर रगरेज आदी उपस्थित होते.