देश विदेशतील महत्त्वाच्या घडामोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत महासागरात भूकंपाचे जोरदार धक्के

दक्षिण प्रशांत महासागरात 6.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली, अशी माहिती हिंदुस्थानच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली. हा भूकंप रविवारी दुपारी तीनच्या सुमारास झाला. या भूकंपामुळे कोणतेही त्सुनामी आली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू ज्या ठिकाणी होता तो भाग प्रशांत महासागराचा रिंग ऑफ फायरचा भाग आहे. हे जगातील सर्वात सक्रिय भूकंपाचे क्षेत्र मानले जाते. रिंग ऑफ फायरमध्ये अनेक टेक्टोनिकप्लेटे यांची एकमेकांशी टक्कर होते. याआधीही शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली आहे. 1960 मध्ये चिलीत 9.5 तीव्रतेचा भूकंप आला होता.

इंडोनेशियात कचऱ्याचा ढिग अंगावर पडून 5 ठार

इंडोनेशियात कचऱ्याचा ढिग अंगावर पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक या ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही दुर्घटना राजधानी जकार्ताजवळील बंटारगेबांग वेस्ट ट्रिटमेंट फॅसिलिटीमध्ये झाली. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 300 हून अधिक बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले. दुर्घटनेत ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात दोघे जण हे कचरा ट्रक ड्रायव्हर, तर दोघे जण दुकानदार होते. हे लोक कचऱ्याच्या बाजूला आराम करत होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

नेपाळ निवडणुकीत 14 महिला उमेदवारांचा विजय

नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत 14 महिला निवडून आल्या आहेत. ही संख्या एकूण जागांपैकी 8 टक्क्यांहून अधिक आहे. यात 13 जागांवर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे, तर एका जागेवर नेपाली काँग्रेसच्या महिलेचा विजय झाला आहे. 2022 च्या निवडणूक तुलनेत ही संख्या अधिक आहे. त्या वेळी केवळ 9 महिलांना विजय मिळवता आला होता. नेपाळच्या संविधानात संसदेत महिलांचे कमीत कमी 33 टक्के प्रतिनिधित्व असायला हवे अशी तरतूद आहे, परंतु राजकीय पक्षांकडून यावर गांभीर्याने विचार होताना दिसत नाही.

सेवानिवृत्त न्यायाधीशांना घातला 1 कोटींचा गंडा

हैदराबादच्या मलकाजगिरी येथे राहणाऱ्या एका 69 वर्षीय निवृत्त जिल्हा न्यायाधीशांना सायबर चोरांनी डिजिटल अरेस्टची धमकी देऊन एक कोटी रुपयांचा गंडा घातला. सायबर चोरांनी एक आठवडय़ापूर्वी या न्यायाधीशाला फोन केला होता. तुमचा फोन नंबर महिलांची तस्करीसह अन्य गुह्यांसाठी वापरण्यात आला आहे, असे सांगून त्यांना एक कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यांना डिजिटल अरेस्टची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माजी न्यायाधीशांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला.