झुकरबर्गने माझी माफी मागितली
फेसबुकचे सीईओ मार्प झुकरबर्ग यांनी सेन्सॉर करण्यासाठी माझी माफी मागितली आहे, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केला. खरं म्हणजे हे खूपच आश्चर्यकारक आणि हिंमत देणारे होते, असे ट्रम्प म्हणाले. झुकरबर्ग डेमोव्रॅटिकला पाठिंबा देणार नाही, असेही आपल्याला सांगितल्याचे ट्रम्प या वेळी म्हणाले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या बातम्या आणि पह्टोला सेन्सॉर करणाऱ्या बातम्यांवरून ‘गुगल’वर निशाणा साधला आहे.
कॅनडामध्ये हिंदुस्थानी लोकांवर हल्ले वाढले
कॅनडामध्ये राहत असलेल्या हिंदुस्थानी लोकांवर हल्ले वाढले. कॅनडामधील शीख समाजाच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. मार्च 2019 मध्ये हल्ल्याचा आकडा 35 टक्क्यांवरून आता 49 टक्के झाला आहे. शीख समाजावर खोटे आरोप केले जात आहेत. त्यांच्या पगडीवर आक्षेपार्ह टीका केली जात आहे. हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
इंटेलला 35 अब्ज डॉलरचे नुकसान
अमेरिकन चिप निर्माता पंपनी इंटेलसाठी शुक्रवारचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला. कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांना जबर फटका बसला आहे. पंपनीला अवघ्या एका दिवसात जवळपास 35 अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले. शुक्रवारी इंटेलचे शेअर्स 26 टक्क्यांनी घसरले. आयपीओ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.
अमेरिकेचे हेलिकॉप्टर जपानमध्ये कोसळले
अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर जपानमध्ये कोसळले. ही घटना शनिवारी जपानच्या टोकियोच्या दक्षिण-पश्चिम भागात सकाळी घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. हेलिकॉप्टर एका दैनंदिन मिशनवर होते. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये कोणतीही गंभीर समस्या नव्हती. हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत.
अमेरिकेत दोन हिंदुस्थानींना अटक
अमेरिकेत दोन हिंदुस्थानी नागरिकांना ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सिमरनजीत सिंह आणि गुसिमरत सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका ट्रॅक्टरमधून हे दोघे जण ड्रग्जची तस्करी करीत होते. तब्बल 40 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत बाजारात 10.5 मिलियन डॉलरहून अधिक आहे.