मुंबईतील प्रकल्पांच्या नुसत्या घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई महानगर, ठाणे परिसरात मेट्रो प्रकल्पाचा 50 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे 2023 अखेर पूर्णत्वास जाईल. यासाठी राज्य सरकारकडून 351 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

मुंबई, ठाणे परिसरातील प्रवाशांच्या सुविधांना सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे विकसित करण्यात येत असून आतापर्यंत 46 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीला खुला झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई मेट्रो मार्ग 11  वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रकल्पावर अंदाजित 8 हजार 739 कोटी रुपये तर मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा यावर अंदाजित 5 हजार 865 कोटींचा खर्च करण्यात येईल असे फडणवीस म्हणाले.

मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे आणि वसई खाडी एकमेकांना जोडण्याचे 424 कोटी रुपये किमतीचे काम हाती घेण्यात येत आहे, त्यानुसार गेट वे ऑफ इंडिया जवळ रेडोओ क्लबनजीक प्रवाशी जलवाहतुकीसाठी जेट्टी आणि संबंधित सुविधा उभारण्यासाठी 162 कोटी 20 लाख रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी, नवी मुंबई अशी जलमार्गाने प्रवाशी वाहतूक शक्य होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल 2025पर्यंत

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर, इंदू मिल येथील स्मारकाचे काम एप्रिल 2025पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्प

मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1 हजार 729 कोटी रुपये अंदाजित खर्चाची नागरी सेवा सुविधा सुधारणेची 820 कामे हाती घेतली असून 121 कामे पूर्ण झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मुंबई महानगर क्षेत्रातील पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणी पुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विविध उड्डाणपुलांची कामे या वर्षी पूर्णत्वास येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ओस पडलेल्या सरकारी शाळा भरण्यासाठी धडपड

सरकारी शाळांमधील पटसंख्या घसरत चालली आहे. त्यातच शिक्षकवर्गही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने सरकारवर नाराज आहे. ही नाराजी दूर करतानाच ओस पडलेल्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठीही फडणवीस यांनी पुढील घोषणा केल्या.

इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,  प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचे मानधन 6 हजार रुपयांवरून 16 हजार रुपये,  माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 8 हजार वरून 18 हजार रुपये, उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 9 हजार वरून 20 हजार रुपये, इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती एक हजारवरून पाच हजार रुपये, इयत्ता 8 वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दीड हजारवरून साडेसात हजार रुपये वाढ.

पत्रकारांच्या कल्याण निधीत वाढ

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या वर्षासाठी 50 कोटी रुपये वाढवून देण्यात येत असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.