
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी काल शपथ घेतल्यानंतर आता त्यांनी आपले 21 जणांचे मंत्रिमंडळ जाहीर केले आहे. या मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. यानुसार ज्येष्ठ राजकीय नेते शाह महमूद कुरेशी हे पुन्हा परराष्ट्र मंत्री होणार आहेत. लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळातील कमीत कमी 12 जणांना इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. या मंत्रिमंडळात शिरीन मझरी, झुबेदा जलाल, फेहनिदा मिर्झा या तीन महिलांना स्थान दिले आहे.
परवेझ खत्तक संरक्षण मंत्री
या मंत्रिमंडळात परवेज खत्तक हे संरक्षण मंत्री तर असद उमेद यांच्याकडे अर्थ खाते दिले आहे. या मंत्रिमंडळात परवेझ मुशर्रफ यांचे माजी प्रवक्ते, त्यांच्या ऍटर्नी जनरललाही स्थान मिळाले आहे. परवेझ मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे खाते सांभाळणारे रावळपिंडीचे शेख रशीद यांच्याकडे या मंत्रिमंडळातही तेच खाते देण्यात आले आहे.
मुंबईवर हल्ला झाला तेव्हा कुरेशीच होते विदेश मंत्री
पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008मध्ये मुंबईवर हल्ला केला तेव्हा शाह महमूद कुरेशी हेच पाकचे परराष्ट्र मंत्री होते. विशेष म्हणजे हा हल्ला झाला त्या वेळी हे कुरैशी राजधानी दिल्लीत होते. त्या वेळी ते पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सरकारमध्ये 2008 ते 2011 या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री होते. हे कुरेशी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पार्टीचे आता उपाध्यक्ष आहेत. त्यांना पुन्हा परराष्ट्र मंत्री केल्याने त्यांच्या नियुक्तीमागे पाक लष्कराचा दबाव नाही ना, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.





























































