शपथविधी सोहळ्यासाठी इम्रान खान पंतप्रधान मोदींना देणार निमंत्रण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
क्रिकेटपटू इम्रान खान लवकरच पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. इम्रान खान हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीपेक्षा त्यांच्या लव्ह अफेयर्समुळेच जास्त चर्चेत राहिले
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान ११ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आले होते, तेव्हा त्यांनी शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह शेजारी देशांच्या प्रमुखांना आणि सार्क देशांच्या प्रमुखांना बोलावून राजनैतिक संबंध दृढ केले होते. आता इम्रानही राजनैतिक संबंध दृढ करण्यासाठी मोदींसह शेजारी देशांच्या प्रमुखांना बोलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला हिंदूस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याबाबत विचार सुरू असल्याचे पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाकडून सांगण्यात आले. मोदी यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्याबाबत पक्षाची कोर कमिटी चर्चा करत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी सांगितले. दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी या सोहळ्याला मोदींना बोलवण्याचा विचार आहे. पक्षाचा याबाबतचा निर्णय झाल्यावर परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इम्रान खान यांना फोन करून त्यांचे विजयाबाबत अभिनंदन केले होते. तसेच द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी मैत्रीचे नवे पर्व सुरू करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.