
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. खान यांनी लाहोरमधील जाहीर सभेदरम्यान हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ लावला आणि हिंदुस्थानचे कौतुक केले. इम्रान खान पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी एका जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेचा हिंदुस्थानवर सतत दबाव आहे. असे असतानाही जयशंकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणे कौतुकास्पद आहे.
सभेत हा व्हिडिओ दाखवल्यानंतर इम्रान खान यांनी जयशंकर यांचे इंग्रजी संभाषण भाषांतरित करून उपस्थितांना सांगितले, ते म्हणाले की, अमेरिकेने हिंदुस्थानला रशियाकडून तेल न घेण्याचे आदेश दिले होते, पण हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला कसे चोख प्रत्युत्तर दिले ते तुम्ही ऐकू शकता. व्हिडिओमध्ये जयशंकर त्यांना सांगतात तुम्ही कोण आहात? युरोप रशियाकडून गॅस खरेदी करत असून लोकांच्या गरजेनुसार आम्ही गॅस खरेदी करू, असे जयशंकर म्हणाले. याला म्हणतात स्वतंत्र देश.
जब पाकिस्तान का एक पूर्व प्रधानमंत्री अपनी रैली में भारत के विदेश मंत्री का वीडियो चलाए और सामने मौजूद भीड़ से कहे.. इसे कहते हैं आज़ाद मुल्क।..तो मुस्कुराइए और फख्र से कहिए जय हिंद! pic.twitter.com/VTWnAYjlBZ
— Pranay Upadhyaya (@JournoPranay) August 14, 2022
यावेळी खान म्हणाले की, “हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी केले कारण ते देशातील लोकांच्या हिताचे होते.” जर स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थान कठोर भूमिका घेऊन आपल्या जनतेच्या गरजेनुसार परराष्ट्र धोरण बनवू शकत असेल, तर पाकिस्तान असे का करत नाही.
सत्तेतून पायउतार केल्यानंतर इम्रान खान यांनी हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचे अनेकदा कौतुक केले आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पुढील महिन्यात लंडनहून पाकिस्तानात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा इम्रानने केला आहे. शरीफ यांचा लंडनमधून परतण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून माझी हकालपट्टी करण्यात आल्याचे खान यावेळी म्हणाले.




























































