
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इमरान खान ११ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या पक्षाला ११६ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी १३७ जागांची गरज असल्याने २१ जागा त्यांना हव्या आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी चार पक्ष पुढे आले आहेत. मुताहिदा कौमी मुव्हमेंट या पक्षाच्या सहा, ग्रेंड डेमेक्रटिक अलायन्सच्या दोन, पीएमएल कैद आणि बलुचिस्तान अवामी पार्टी या पक्षांच्या प्रत्येकी चार जागा आहेत. यापक्षांनी इमरान यांना पाठिंबा दिला आहे. तसेच पाच अपक्ष उमेदवारही इमरान यांना पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा ते गाठू शकतात. इमरान ११ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पाकिस्तान रेडिओने दिली आहे.
लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करणार असल्याचे इमरान यांनी रविवारी सांगितले. तसेच खैबर पख्तूनवा प्रांताच्या मुख्यमंत्र्यांची घोषणाही लवकरच करण्यात येईल असेही ते म्हणाले.सिंध प्रांतातील गरीबी दूर करण्याला सरकार प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १४ ऑगस्टपुर्वी इमरान पंतप्रधानपदाची शपथ घेतील असे पीटीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. इमरान खान यांच्याविरोधात नवीज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज आणि बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पिपल्स पार्टी एकत्र येणार आहेत. पीएमएल-एनच्या ६४ आणि पीपीपीच्या ४३ जागा आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची रविवारी बैठक झाली. याआधी २००२ मध्येही हे पक्ष एकत्र आले होते.
























































