
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोनवरून अभिनंदन केले. तसेच दोन्ही देशांतील लोकांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम करू अशी अपेक्षाही व्यक्त केली. मोदी यांनी त्यांना दिलेल्या उत्तरात दोन्ही देशांमध्ये शांतता तसेच समृद्धीसाठी हिंसामुक्त आणि दहशतवादमुक्त वातावरणाची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. फेब्रुवारीत झालेला पुलवामा हल्ला, त्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांनी फोनवरून चर्चा केली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी रविवारी इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केल्याचे आणि खान यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. दक्षिण आशियातील शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी इम्रान खान यांनी मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही फैसल यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही इम्रान खान यांच्या फोनला दुजोरा दिला आहे. दरम्यान, हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या अड्डय़ावर सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर हिंदुस्थानने जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले. यूएनमध्ये सातत्याने चीनने हिंदुस्थानच्या भूमिकेचा विरोध केला, परंतु चीनलाही त्यानंतर सर्व देशांचा विरोध झाल्याने अखेर चीनने हिंदुस्थानच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
– पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी हिंदुस्थान-पाकिस्तानातील विविध प्रश्न मोदी सरकारबरोबर चर्चा करून सोडवण्यास तयार असल्याचे म्हटले. दोन्ही देशांत शांती प्रस्थापित करण्यासाठी हिंदुस्थान सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असे कुरेशी यांनी पाकिस्तान रेडिओला सांगितले. शनिवारी त्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर ते बोलत होते.
























































