27 दिवसांनी इम्रान खान यांना भेटली बहीण; तब्येत ठीक, मात्र मानसिक छळ होत असल्याचा आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण उज्मा खान यांनी रावळपिंडी येथील आदियाला तुरुंगात आज सायंकाळी भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे, मात्र त्यांना प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा आरोप उज्मा खान यांनी केला.

आदियाला तुरुंगाबाहेर इम्रान खान यांच्या बहिणी निदर्शनाला बसल्या होत्या. उच्च न्यायालयाचे आदेश असूनही त्यांना इम्रान खान यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप बहिणींनी केला होता. त्यातच इम्रान खान यांची तुरुंगात हत्या करण्यात आल्याची अफवा पसरली. त्यामुळे इम्रान यांच्या पीटीआय पक्षाने संतप्त निदर्शने केली. अखेर उज्मा खाना यांना इम्रान यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी त्या इम्रान खान यांना भेटल्या. जवळपास 20 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली.

आसिम मुनीरवर आरोप

इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर उज्मा खान म्हणाल्या की, इम्रान खान यांची तब्येत ठीक आहे, परंतु ते संतप्त आहेत. त्यांचा मानसिक छळ होत आहे. यासाठी आसिम मुनीर जबाबदार आहे. इम्रान खान यांचा बाहेरील जगाशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. अलिमा आणि नौरिन यांना भेटल्यानंतर चर्चेतील इतर माहिती देऊ, असे उज्मा खान म्हणाल्या.

पाकिस्तानात तीव्र निदर्शने, रावळपिंडीत जमावबंदी

इम्रान खान यांची तब्बल 27 दिवसांनंतर कुटुंबीयांशी भेट झाली आहे. इम्रान खान यांचा मृत्यू झाला असून तो लपविण्यासाठी सरकार त्यांना कुणाला भेटू देत नाही, अशी अफवा पसरली. त्यानंतर आज पाकिस्तानात तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यामुळे रावळपिंडीपासून इस्लमाबादपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. रावळपिंडीमध्ये सरकारने 3 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.