भिवंडी वऱहाळा तलावाचे ‘तिवरे’ होण्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | भिवंडी

वऱहाळा तलावाच्या मुख्य भिंतीची गेल्या २० वर्षांपासून दुरुस्ती केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पावसात हा तलाव ओसंडून वाहत असून सांडव्याच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. पाण्याचा जोर वाढल्यास भिंतीला धोका निर्माण होऊन ‘तिवरे’ धरणासारखी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. भिवंडी भारत कॉलनी, चंदनबाग, भवानीनगर येथील हजारो रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून प्रशासकीय यंत्रणा अजून जागी झालेली नाही.

५० वर्षांपूर्वी जुन्या भिवंडीतील नागरिकांची तहाण भागवण्यासाठी हा तलाव बांधण्यात आला. आजही तलावातील दोन एमएलटी पाणी पिण्यासाठी वापरले जात असून त्याची देखभाल दुरुस्ती महानगरपालिका करते. पाणीसाठा अडवण्यासाठी कामतघर रस्त्याकडेला दगडी बांध बनवण्यात आला असून तो जीर्ण झाला आहे. दुरुस्ती अभावी हा बांध कमकुवत झाला असून दगडांच्या चिरांमधून पाणी झिरपत आहे. यामुळे दुर्घटना घडली तर भारत कॉलनी, चंदनबाग, भवानीनगर या परिसराला धोका निर्माण होऊ शकतो.

स्ट्रक्चरल ऑडिट नाही
पालिका प्रशासनाने या तलावाच्या मुख्य भिंतीचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले नसल्याची बाब पुढे आली आहे. सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या बांधावरून मोठय़ा प्रमाणावर पाणी विसर्ग होत आहे. त्यामुळे तलावाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तलावाच्या भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी गटनेता नीलेश चौधरी यांनी केली आहे.