
छत्तीसगडच्या सुकमा आणि बिजापूर जिह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एकूण 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन वेगवेगळय़ा ठिकाणी कारवाया असून सुरक्षा दलांकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 8 लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षल कमांडर मंगडू याचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा आणि बिजापूर जिह्याच्या दक्षिण भागात मोठय़ा प्रमाणावर सशस्त्र नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर त्या भागात मोहीम आखण्यात आली. विजापूरच्या जंगलात आज पहाटे पाच वाजतापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. सुकमा जिह्यात सकाळी 8 वाजताच्या सुमारास चकमक सुरू झाली. या घटनेत छत्तीसगडमधील कोंटा येथील एएसपी आकाश राव गिरीपुंजे या मराठी अधिकाऱयावर हल्ला करत त्यांचा जीव घेणारे माओवादी आणि त्यांचा कमांडरही मंगडू हा मारला गेल्याची माहिती आहे.



























































