
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने धुमशान घातले असतानाच आता पालघरकर साथीच्या आजाराने बेजार झाले आहेत. सहा महिन्यांत हे आजार बळावत चालल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत डेंग्यूचे 153 रुग्ण आढळून आले आहेत. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि या रोगांचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. तापाने फणफणलेल्या रुग्णांनी सरकारी तसेच खासगी दवाखाने पॅक झाले आहेत.
पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, वसई या आठही तालुक्याला पावसाने झोडपून काढले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचले. त्यामुळे शहरात रोगराई पसरली आहे. हिवताप निर्मूलन विभागाने दिलेल्या आकडेवाडीनुसार जानेवारी ते जूनपर्यंत 153 डेंग्यूचे रुग्ण सापडले. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे. सुदैवाने आतापर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही. जूनमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या 18 आहे.
नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरडा दिवस पाळणे तसेच फवारणी करून परिस्थिती आटोक्यात आणण्यात येते. ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत त्या ठिकाणी लगेचच उपायोजना करत आहोत.
डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी