भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, एकनाथ खडसेंचा दोषमुक्ततेचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा अयोग्य वापर केला असे नमूद करत विशेष न्यायालयाने खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांचा दोषमुक्ततेसाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे या तिघांविरोधात आरोप निश्चित केले जाणार आहेत.

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड कमी किमतीत खरेदी केल्याच्या आरोपावरून खडसे यांना ईडीने समन्स बजावले होते. तसेच त्यांच्याविरुद्ध ईसीआयआर दाखल केला. एवढेच काय तर ईडीने एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी तसेच जावई गिरीश चौधरी व अन्य काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर याप्रकरणावर नुकतीच सुनावणी झाली. दरम्यान न्यायाधीशांनी आरोप निश्चित करण्यासाठी 18 डिसेंबर रोजी प्रकरण तहकूब केले असून सुनावणीला तिन्ही आरोपींना उपस्थित राहावे लागणार आहे.