
गुंजूर मैदानावर झालेल्या 44 व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली अभेद्य खो-खो परंपरा अधोरेखित केली. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या रणरागिणींनी थरारक अंतिम सामन्यात ओडिशावर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर मुलांच्या गटात यजमान कर्नाटककडून पराभव पत्करावा लागला असला तरी महाराष्ट्राच्या मुलांनी दिलेली झुंजार लढत सुवर्णाइतकीच तेजस्वी ठरली.
वेग, चपळता, डावपेच आणि अफाट जिद्दीचा संगम असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी सलग 11 वे आणि एकूण 27 वे राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकत इतिहासात आपले स्थान अधिक भक्कम केले. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय खो-खोवर वर्चस्व राखणाऱया महाराष्ट्राने याही वेळी आपली सुवर्ण परंपरा अखंड ठेवत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्राची सुवर्णगाथा भक्कमच
मागील वर्षापर्यंत सलग 10 दुहेरी अजिंक्यपदे जिंकणाऱया महाराष्ट्रासाठी यंदा मुलांच्या गटातील सुवर्ण हुकले असले तरी मुलींच्या संघाने इतिहासाला नवी झळाळी देत अजिंक्यपदाचा झेंडा पुन्हा फडकावला.
या स्पर्धेत सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील स्नेहा लामकाने हिने जानकी पुरस्कार पटकावत महाराष्ट्राच्या यशात मानाचा शिरपेच रोवला, तर कर्नाटकच्या विजय बी. याला वीर अभिमन्यू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पराभवातही महाराष्ट्राची शान
मुलांच्या अंतिम सामन्यात कर्नाटकने 35-30 असा विजय मिळवला. मध्यंतरातील पिछाडीवरूनही महाराष्ट्राच्या मुलांनी शेवटपर्यंत हार न मानता दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली. राज जाधव, हरदया वसावे, पार्थ देवकाते, जितेंद्र वसावे आणि योगेश पवार यांनी संघाची प्रतिष्ठा जपली.
महाराष्ट्राची विजयाची गुढी
महाराष्ट्र-ओडिशा अंतिम सामना अक्षरशः श्वास रोखून धरणारा ठरला. मध्यंतराला 14-11 अशी आघाडी असूनही सामना 25-25 असा बरोबरीत गेला. मात्र अतिरिक्त डावात महाराष्ट्राच्या रणरागिणींनी अनुभव, संयम आणि आक्रमक खेळाचा उत्तम नमुना दाखवत 44-33 असा 11 गुणांनी दणदणीत विजय मिळवला.
स्नेहा लामकाने, मैथिली पवार, सानिका चाफे, दीक्षा काटेकर, श्रावणी तामखडे, श्रुती चोरमरे आणि श्वेता नवले यांनी विजयाची गुढी उभारताना प्रेक्षकांना अक्षरशः जागेवर खिळवून ठेवले.



























































