अंधेरीत पोलिसावर केला चाकू हल्ला

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. चाकू हल्ल्यात पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस शिपाई हे जखमी झाले आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आकिब खान विरोधात गुन्हा नोंद केला.

शशिकांत पाटील हे पोलीस शिपाई म्हणून डी. एन. नगर पोलीस ठाण्यात काम करतात. गुरुवारी उप निरीक्षक परदेशी, खैरमोडे, पवार, कारंडे आदींचे पथक हे आकिबला अटक करण्यासाठी अंधेरीच्या फारुकीया मशीद येथे गेले होते. पोलिसांचे पथक फारुकीया मशीद जवळ आले. तेव्हा आकिब याने तुम्ही मला पकडण्यासाठी आले आहेत ना असे सांगून पोलिसांना आव्हान देत पाटील याच्या पोटात मारण्याच्या हेतूने वार केला. तो वार चुकल्यावर त्याने उप निरीक्षक परदेशी याच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो चाकू परदेशी याच्या हाताला लागला. त्यानंतर त्याचे आणखी दोन साथीदार आले. अटक टाळण्यासाठी आकिबने स्वतःला जखमी करून घेतले.