गोखले पुलाच्या उंचीत पावणेदोन मीटरने वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीतील गोखले पुलाची उंची सुमारे पावणेदोन मीटरने वाढली आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने जुहू ते अंधेरीदरम्यान बांधलेल्या पुलाला जोडणे आता अशक्य झाले आहे. त्यामुळे गोखले पुलाच्या शेजारी तातडीने रॅम्प उभारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गोखले पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने 7 नोव्हेंबर 2022 रोजी वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वे व मुंबई महापालिकेने समन्वय साधत 1 एप्रिल 2023 पासून गोखले पुलाचे काम सुरू केले. रविवार, 25 फेब्रुवारी रोजी गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली, मात्र गोखले पुलाची उंची दीड ते पावणेदोन मीटरने वाढ झाल्याने पालिकेसाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना रेल्वे विभागामार्फत नवीन धोरण जाहीर करण्यात आले. त्यामुळे जुन्या पुलांचे पाडकाम करून उभारण्यात येणाऱया नवीन पुलाची उंची दीड मीटर वाढवणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे या पुलाची उंची दीड ते पावणेदोन मीटरने वाढली आहे. हा तांत्रिक दोष नाही, असा खुलासा आयआयटी मुंबई, व्हीजेटीआय या संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.