
पालिकेच्या आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्या मानधनात लवकरच वाढ होणार आहे. शिवाय क्षयरोग खात्यातील कंत्राटी कामगारांनाही विविध भत्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून सिस्टर टय़ूटर आणि मेट्रेनेची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केलेल्या पाठपुराव्याला, ठिय्या आंदोलनाला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या मागण्या मान्य न झाल्यास 15 जानेवारीला मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आल्याचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले आहे.
आरोग्य खात्यातील कर्मचारी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाची दखल घेऊन काही दिवसांपूर्वी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीला संघटनेचे सरचिटणीस सत्यवान जावकर, रंजना नेवाळकर, ऍड. रचना अग्रवाल, संजय वाघ, हरिदास जामठे, अतुल कुलकर्णी यांनी कामगारांची बाजू मांडली. कामगारांच्या विविध मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा झाली असून त्यातून या कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे बाबा कदम यांनी सांगितले. या चर्चेच्या वेळेत कंत्राटदारांची मक्तेदारी मोडावी, कंत्राटी कामगारांचे शोषण रोखावे तसेच काही ठिकाणी कंत्राटी कामगारांनी केलेले गैरप्रकार थांबावे म्हणून कंत्राटीदारी पद्धत बंद करून महानगरपालिकेने सरळ सेवेतून पदे भरावी अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली आहे.
या मागण्या पूर्ण होणार
- जन्म-मृत्यू कारकुनांना क वर्गात समाविष्ट करण्यात येणार. रिक्त पदे भरणार.
- व्रणोपचार, नाभिक ही रिक्त पदे भरण्यात येतील. व्रणोपचारांना पदोन्नती देण्यात येईल.
- नोंदणी सहाय्यक या मृत झालेल्या संवर्गासाठी लिपिक वर्गाची नेमणूक करण्यात येईल.
- आरोग्य केंद्र, रुग्णालयातील सिस्टर टय़ूटर, मेट्रेनची पदे तत्काळ भरण्यात येतील.


























































