मराठी उद्योजक घडवण्यासाठी नवी मुंबईत इन्क्युबेशन सेंटर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी उद्योजक तयार करण्यासाठी नवी मुंबईत इन्क्युबेशन सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाने केली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आणि नॅशनल डिफेन्स इनोव्हेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहे. वाशी येथे येत्या दोन महिन्यात हे सेंटर कार्यान्वित होणार असून तिथे नवउद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यातील लघुउद्योगांची क्षमता वाढवण्यासाठी मुंबईत नुकताच एक विशेष समारंभ पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी नवी मुंबईत इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. या सेंटरच्या माध्यमातून मराठी तरुणांना उद्योग विश्वाकडे आकर्षित करण्यात येणार आहे. उद्योजकांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे.

उद्योजकांचे हित लक्षात ठेवून अनेक उपक्रम या सेंटरमध्ये राबवण्यात येणार असून नवीन उद्योजकांना व्यावसायिक संधी या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे, असे अतुल शिरोडकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी महाराष्ट्र इन्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, राष्ट्रीय एमएसएमई मंडळाचे सदस्य प्रदीप पेशकर, हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे अतिरिक्त महाव्यवस्थापक डॉ. अजित भांदक्कर, संरक्षण इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान सल्लागार डॉ. विवेककुमार राय, नॅशनल डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे युवराज वाडजे, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या प्रादेशिक संचालक उज्ज्वला हावरे, प्रा. मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

एमआयडीसीची उद्योग क्षमता वाढवणार

महाराष्टातील एमआयडीसीची उद्योग क्षमता वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. त्यासाठी बंद पडलेल्या उद्योगांच्या जमिनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मदतीने पुन्हा ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे. या जुन्या उद्योगांच्या ठिकाणी इलेक्ट्रीक कनेक्शन आणि रोड कनेक्शन चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. त्याचाही फायदा उद्योगवाढीसाठी होणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केली.