अंडर-19 वर्ल्ड कपमधील राडा, पाच खेळाडूंना आयसीसीकडून शिक्षा

ind-v-ban

अंडर-19 वर्ल्ड कपची फायनल जिंकल्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी मैदानात गैरवर्तणूक केली. आक्षेपार्ह वर्तन केले. हिंदुस्थान-बांगलादेश या दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक घडली. यामुळे जंटलमन खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला काळा डाग लागला. यानंतर आयसीसीने व्हिडीओ फुटेज तपासून पाच खेळाडूंना शिक्षा सुनावली. तौहीद हृदोय, शमीम होसैन व रकीबुल हसन या बांगलादेशच्या खेळाडूंसह आकाश सिंग व रवी बिष्णोई या हिंदुस्थानी खेळाडूंवर कारवाई करण्यात आली.

पाच खेळाडू आणि संघाचे स्टाफ यांना आयसीसीच्या आचार संहितेच्या लेव्हल-3 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या सर्वांवर कलम 2.21 तर रवी बिष्णोईवर कलम 2.5 नुसार आरोप लावण्यात आले आहेत. या सर्व खेळाडू आणि स्टाफनी त्यांची शिक्षा स्वीकारल्याचे ‘आयसीसी’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बांगलादेशच्या तौहीद हृदोयला 10 निलंबन गुण आणि 6 नकारात्मक, शमीम होसैनला आठ निलंबन गुण तर रकीबुल हसनला 5 निलंबन गुण आणि 5 नकारात्मक गुण दिले आहेत. हिंदुस्थानी खेळाडू आकाश सिंगने शिक्षा मान्य केली आहे. त्याला आठ निलंबन गुण आणि 6 नकारात्मक गुण दिले गेले आहेत. रवी बिष्णोईला 5 निलंबन गुण तर 5 नकारात्मक गुण दिले आहेत.

वर्ल्डकप जिंकताच बांगलादेशी खेळाडूंचे ‘असभ्य’ वर्तन; हिंदुस्थानी खेळाडूंना शिवीगाळ, धक्काबुक्की

सीनियर, अंडर-19 सामन्याला मुकणार
पाचही खेळाडूंना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा परिणाम त्यांच्या अंडर-19 किंवा सीनियर स्तरावरील क्रिकेटवर होणार आहे. एक निलंबित गुणामुळे त्यांना एक वन डे किंवा टी-20 किंवा अंडर 19 सामना किंवा आंतरराष्ट्रीय सामन्याला मुकावे लागणार आहे. आगामी काळातील लढतींमध्ये याचे पडसाद उमटताना दिसतील.

आपली प्रतिक्रिया द्या