
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून (29 ऑक्टोबर) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. आगामी टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. मात्र, पहिल्याच टी-20 सामन्यामध्ये पावसाने अनपेक्षित धप्पा दिल्याने सामना रद्द करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने आपली पहिली विकेट 35 या धावसंख्येवर अभिषेक शर्माच्या रुपात गमावली. मात्र, त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी धुवांधार फटकेबाजी करत सामन्याची रंगत वाढवली. शुभमन गिलने 20 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 37 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 24 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 39 धावा केल्या. मात्र ऐन रंगात आलेल्या या दोन खेळाडूंचा पावसाने बेरंग केला. त्यामुळे फक्त 9.4 षटकांचा खेळा झाला आणि टीम इंडियाने एक विकेट गमावत 97 धावा केल्या. आता पुढील सामना 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे.




























































