Ind vs Aus अव्वल संघांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई, हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी आजपासून  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या बहुचर्चित कसोटी क्रिकेट मालिकेस गुरुवार, 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये प्रारंभ होणार आहे. ही चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर स्ट्रॉफी उभय संघांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियन संघ 19 वर्षांनंतर हिंदुस्थानात मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. दुसरीकडे यजमान हिंदुस्थानी संघ हा पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाचे ‘‘नंबर वन’चे साम्राज्य खालसा करण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वातील या दोन अव्वल संघांमध्ये खऱया अर्थाने आता वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

रथी–महारथी फलंदाज दिमतीला

हिंदुस्थानकडे कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल किंवा सूर्यकुमार यादव असे रथी-महारथी फलंदाज आहेत. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून के. एस. भरत किंवा ईशान किशन यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. दोघांकडेही फलंदाजीची गुणवत्ता ठासून ठरलेली आहे. याचबरोबर रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा हे अष्टपैलू खेळाडू जबरदस्त फलंदाजही आहेत. त्यामुळे खोलवर असलेली हिंदुस्थानी फलंदाजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा घामटा काढण्याची क्षमता बाळगून आहे. रोहित आणि विराट या मालिकेत कसे खेळतात यावरही बरेच काही अवलंबून असेल.

ऑस्ट्रेलियाची अननुभवी फलंदाजी

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना हिंदुस्थानी खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव नाहीय. फक्त डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ व मॅट रॅनशॉ यांनाच हिंदुस्थानात खेळण्याचा अनुभव आहे. यात वॉर्नर व स्मिथमध्ये हिंदुस्थानी गोलंदाजीचा समर्थपणे सामना करण्याची क्षमता आहे. हे दोघे चालले तर मग कसोटी मालिका रंगतदार होऊ शकते. ऑस्ट्रेलियाकडेही आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे, हे ‘टीम इंडिया’ला विसरता येणार नाही.

लायन–एगर जोडीपासून सावधान

ऑस्ट्रेलियाकडेही नाथन लायन व ऍश्टन एगर अशी दर्जेदार फिरकीची जोडगोळी आहे. लायन अतिशय अनुभवी गोलंदाज असून हिंदुस्थान दौऱयावरील तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वांत यशस्वी गोलंदाज होय. विराट कोहलीसारख्या फलंदाजालाही त्याने फारसे खेळू दिलेले नाहीये. शिवाय स्टिव्ह स्मिथही पार्टटाइम गोलंदाजी करू शकतो. अलूर (बंगळुरू) येथील सराव शिबिरात स्मिथने काही वेळ गोलंदाजीचाही सराव केलेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांपासून ‘टीम इंडिया’ला सावधान राहावे लागणार आहे.

कांगारूंना होणार तापमानाचा ताप

नागपूरमधील कमाल तापमान 33 डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शीत कटिबंधातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा या तापमानाचा चांगलाच ताप होऊ शकतो. पाचही दिवस आकाश निरभ्र असेल असा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचीही ‘कसोटी’ लागणार आहे.

अश्विन–जाडेजा फिरकी घेण्यास आतूर

हिंदुस्थानला मायदेशात पराभूत करणे किती अवघड असते याची पूर्ण कल्पना ऑस्ट्रेलियाला आहे. देशी खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाज ‘टीम इंडिया’ची मुख्य ताकद असते. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा ही क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फिरकीची जोडगोळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फिरकी घेण्यासाठी आतूर झाली आहे. गेल्या दहा वर्षांत याच फिरकीच्या जोडगोळीने ऑस्ट्रेलियाला आपल्या तालावर नाचविले. शिवाय, अश्विन-जाडेजा जोडीला कुलदीप यादव, अक्षर पटेल यातील एका फिरकी गोलंदाजाची साथ मिळणार आहे. हिंदुस्थानकडे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव व जयदेव उनाडकट असा वेगवान गोलंदाजीचा ताफा आहे. नागपूरची खेळपट्टी जर फिरकीला साथ देणारी असेल तर हिंदुस्थानी संघ 3 फिरकी व 2 वेगवान गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो. अशा परिस्थितीत शमी व सिराज या वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते.

संभाव्य उभय संघ

हिंदुस्थान ः रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल/सूर्यकुमार यादव, के.एस. भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया ः पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), ऍश्टन अगर, नाथन लायन, मिचेल स्वेप्सन, स्कॉट बोलॅण्ड.