हिंदुस्थानची आजपासून ‘कसोटी’, जायबंदी खेळाडूंमुळे ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटीत कस लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर… दौऱ्यावर आलेले बहुतांश खेळाडू जायबंदी… अशा प्रतिकूल परिस्थितीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानची मदार अर्थातच नव्या दमाच्या खेळाडूंवर असणार आहे. तिसऱ्या कसोटीत जखमी खेळाडूंनीही ऑस्ट्रेलियाला जोरदार प्रतिकार करून सामना बरोबरीत सोडविल्याने ‘टीम इंडिया’चे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे गॅबा मैदानावर गेल्या 32 वर्षांत पराभवाचे तोंड न पाहिलेला कांगारूंचा संघ हिंदुस्थानला कमी लेखण्यास तयार नाही.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या संघाकडूनही आपल्याला कडवी लढत मिळू शकते याचा अंदाज यजमान संघाला आला आहे. चार सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे उद्या, 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या व निर्णायक सामन्यांत उभय संघांची ‘कसोटी’ लागणार एवढे नक्की.

अखेरची कसोटी किमान ड्रॉ राहिल्यास गावसकर-बॉर्डर करंडक टीम इंडियाकडे राहणार आहे. ऑस्ट्रेलियाने अखेरचा सामना जिंकल्यास हा करंडक ऑस्ट्रेलियाकडे सुपूर्द करण्यात येईल.

बुमराह, अश्विनचे खेळणे संदिग्ध

जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन या प्रमुख गोलंदाजांचे चौथ्या कसोटीत खेळणे सामन्याच्या पूर्वसंध्येपर्यंतही संदिग्धच होते. त्यामुळे या महत्त्वाच्या खेळाडूंबाबत निर्णय लढतीपूर्वी घेतला जाणार आहे. दुखापतीमुळे दुर्दैवाने हे दोघेही खेळू शकले नाही, तर ‘टीम इंडिया’च्या गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज व नवदीप सैनी या नव्या शिलेदारांच्या खांद्यावर असेल. बुमराहच्या जागेवर शार्दुल ठाकूर आणि अश्विनच्या जागेवर कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना अंतिम अकरामध्ये संधी मिळणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत तब्बल 9 खेळाडूंना दुखापत झाली. मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, हनुमा विहारी, रवींद्र जाडेजा, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह व मयांक अग्रवाल ही ती नऊ खेळाडूंची नावे होय. यातील शमी, यादव, राहुल, विहारी, जाडेजा हे पाच खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहे.

‘जसप्रीत बुमराहाच्या तंदुरुस्तीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. लढतीपूर्वी त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल. बुमराहला खेळायचे की नाही हा निर्णय तो स्वतः घेणार आहे. त्यामुळेच त्याला फिट होण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत वेळ देत आहोत. त्यामुळेच अंतिम 11 खेळाडूंची आम्ही लढतीच्या पूर्वसंध्येला घोषणा केलेली नाही.’

विक्रम राठोड, हिंदुस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक

आजपासून चौथी कसोटी

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया

ब्रिस्बेन, पहाटे 5 वाजता

थेट प्रक्षेपण ‘सोनी’ वाहिनीवर