मालिकेचा ताबा मिळवण्यासाठी हिंदुस्थान गाबावर उतरणार, 11 फिट खेळाडू निवडण्याची ‘कसोटी’

दुखापतीच्या फेरात अडकलेला हिंदुस्थानचा संघ 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी गाबाच्या मैदानावर उतरेल. या कसोटीसाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. मात्र चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत 11 फिट खेळाडू निवडण्याची ‘कसोटी’ संघ व्यवस्थापन आणि कर्णधार अजिंक्य रहाणेवर असणार आहे.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना ब्रिस्बेनमध्ये रंगणार आहे. अॅडलेड कसोटी यजमान आणि मेलबर्न कसोटी पाहुण्या संघाने जिंकली. त्यानंतर सिडनीत झालेली रोमहर्षक कसोटी अनिर्णित राखण्यात टीम इंडियाला यश आले. मात्र या दरम्यान हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा हे दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे चौथ्या कसोटीत फिट खेळाडू मैदानावर उतरवण्याचे आव्हान टीम इंडियापुढे आहे.

कसून सराव

दरम्यान, निर्णायक कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरू आहे. सलामीवीर रोहित शर्मा, शुभमन गिल, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि इतर खेळाडूंनी आज सराव सत्रामध्ये भाग घेतला. दुखापतग्रस्त बुमराह देखील मैदानावर उतरला. मात्र त्याने सरावाचे कपडे घातलेले नव्हते. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासोबत तो चर्चा करताना दिसला. याचा फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो चौथ्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर किंवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमिवर कुलदीप यादव यानेही आज कसून सराव केला.

सिडनीतील अविस्मरणीत झुंज

सिडनी कसोटीत चौथ्या डावात टीम इंडियाने कडवी झुंज दिली आणि सामना अनिर्णित राखला. हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी पाचव्या दिवशी खिंड लढवली. आता चौथ्या कसोटीत विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. मात्र ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाने 1988 पासून एकही सामना गमावलेला नाही, तो एक अॅडव्हांटेज त्यांच्याकडे असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या