राहुल, कोहली, पुजाराचा दमदार शो, हिंदुस्थान 166 धावांनी पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ऍडलेड

हिंदुस्थानने ऍडलेड कसोटीत झोकात पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 235 धावांमध्ये रोखल्यानंतर तिसर्‍या दिवसअखेरीस टीम इंडियाने 3 बाद 151 धावा केल्या असून आता पाहुणा संघ 166 धावांनी पुढे आहे. लोकेश राहुल (44 धावा), विराट कोहली (34 धावा) आणि चेतेश्वर पुजारा (नाबाद 40 धावा) यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे आव्हान परतवून लावत दिवस गाजवला.  

ट्रेव्हीस हेडच्या 72 धावा

ऑस्ट्रेलियाने 7 बाद 191 या धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. यजमान कांगारूंनी यामध्ये 44 धावांची भर घातली. जसप्रीत बुमराहने मिचेल स्टार्कला 15 धावांवर रिषभ पंतकरवी झेलबाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीने ट्रेव्हीस हेडला बाद केले. त्याने 6 चौकारांसह 72 धावांची खेळी साकारली. मोहम्मद शमीनेच जोश हेझलवूडला शून्यावर बाद करीत कांगारूंचा पहिला डाव गारद केला. हिंदुस्थानकडून रविचंद्रन अश्विनने 57 धावा देत 3 फलंदाज बाद केले. जसप्रीत बुमराहने 47 धावा देत 3 फलंदाज बाद केले.

आश्वासक सलामी

मुरली विजय व लोकेश राहुल या दाक्षिणात्य सलामी जोडीवर दुसर्‍या डावात कमालीचा दबाव होता. मात्र या जोडीने पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात करून दिली. लोकेश राहुलने या डावात आपला ठसा उमटवला. त्याने 67 चेंडूंत 1 षटकार व 3 चौकारांसह 44 धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने नेत्रदीपक फटके मारले. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच मिचेल स्टार्कने मुरली विजयला 18 धावांवर बाद करीत पहिला धक्का दिला. जोश हेझलवूडनेही लोकेश राहुलला बाद कांगारूंना ट्रकवर आणले.

यावर एक नजर

यष्टिरक्षक रिषभ पंतने ऍडलेड कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सहा झेल टिपत महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनीने 2009 साली वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंविरुद्ध एका डावात सहा झेल टिपले होते.

विराट कोहलीने शनिवारी ऑस्ट्रेलियातील कसोटीत एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात खेळताना सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या दिग्गज खेळाडूंनी एक हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी

चेतेश्वर पुजारा व विराट कोहली या जोडीने 2 बाद 76 या धावसंख्येवरून टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत दोघांनी संयमी फलंदाजी करतानाच खराब चेंडूंवर धावा करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीने 3 चौकारांसह 34 धावांची खेळी केली. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो 34 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात शतक झळकावत टीम इंडियाचा डाव सावरणारा चेतेश्वर पुजारा 4 चौकारांसह 40 धावांवर खेळत आहे.