
हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी गुड न्यूज आहे. अनुभवी आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने गुरुवारी टीम इंडियाच्या सराव सत्रात सहभाग घेतला. हिंदुस्थानी खेळाडूंसोबतचे त्याचे हे पहिले सराव सत्र ठरले. रोहित शर्मा सराव करतानाचे फोटो बीसीसीआयने आपल्या साइटवर पोस्ट केले. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसऱया कसोटीला सिडनी येथे 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या कसोटीसह चौथ्या कसोटीतही खेळण्यासाठी रोहित शर्मा याप्रसंगी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसत आहे.
रोहित शर्माला आयपीएल दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियातील टी-20 व वन डे मालिकेत खेळू शकला नाही. शिवाय क्वारंटाइन कालावधीमुळे त्याला पहिल्या दोन कसोटींतही सहभागी होता आले नाही. पण आता तो पूर्णपणे फिट असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा तिसऱया कसोटीतील सहभाग जवळपास निश्चित समजला जात आहे. मयांक अग्रवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागण्याची शक्यता यावेळी निर्माण झाली आहे.





























































