Ind vs Aus विशाखापट्टणममध्ये मुसळधार, दुसऱ्या लढतीवर पावसाचे सावट; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये पाहुण्या संघाला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेतील पहिला सामनाही खिशात घातला. मुंबईतील वानखेडे मैदानात रंगलेल्या लढतीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना आज विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. मात्र यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.

विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या लढतीवर पावसाचे सावट आहे. गेल्या काही तासांपासून येथे मुसळधार पाऊस बरसत आहे. यादरम्यान मैदानाचे काही फोटोही समोर आले आहेत. याच पावसापासून बचाव करण्यासाठी खेळपट्टी आणि आउटफिल्ड कव्हरने झाकून ठेवण्यात आल्याचे दिसतेय.

विशाखापट्टणममध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मैदानावर कव्हर टाकलेले असले तरी पावसामुळे आणि ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशिर होण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याने सामना पूर्ण होतो की नाही अशीही शंका आहे.

Accuweather नुसार, विशाखापट्टणममध्ये आज पावसाची 80 टक्के शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी 4 ते 6 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच वाजेच्या सुमारास जवळपास 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना वरुणराजा वाहून नेण्याचीच शक्यता आहे.

ताज्या अपडेटनुसार सकाळी येथे मुसळधार पाऊस झाला. मात्र आता पाऊस थांबला असून आकाशातील ढगांची गर्दीही कमी झाली आहे. त्यामुळे सामना वेळेत सुरू होण्याची आशा आहे.