पदार्पणवीर पुकोव्हस्की, लाबुशेनची अर्धशतके; पंतच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा हिंदुस्थानला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदार्पणवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन  यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी 55 षटकांच्या खेळात 2 बाद 166 अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन 67, तर स्टिव्हन स्मिथ 31 धावांवर खेळत होते. रिषभ पंतने सोडलेल्या दोन झेलमुळे हिंदुस्थानला फटका बसला. पावसाच्या व्यत्ययामुळेही बराच खेळ वाया गेला.

पावसामुळे साडेतीन तासाचा खेळ वाया

नाणेफेक जिंपून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी घेतली. दुसराच कसोटी सामना खेळत असलेल्या मोहम्मद सिराजने चौथ्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला (5) चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मग 7.1 षटकानंतर आलेल्या पावसामुळे तब्बल साडेतीन तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे 90 षटकांऐवजी पहिल्या दिवशी 55 षटकांचाच खेळ होऊ शकला. मात्र आता उर्वरित चार दिवसांच्या खेळात प्रत्येक दिवशी अर्धा-अर्धा तासाचा अधिक खेळ घेण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे.

या कसोटीत एक गमतीदार किस्सा घडला. हिंदुस्थानचा पदार्पणवीर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर विल पुकोव्हस्कीचा बळी घेतला. पदार्पणवीराला बाद करणारा सैनी हा हिंदुस्थानचा पाचवा पदार्पणवीर ठरला. याआधी झहीर खानने 2000मध्ये पदार्पणाच्या कसोटीत बांगलादेशच्या मेहराब हुसैनला बाद केले होते. सर्वप्रथम विजर हजारे यांनी 1946मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना इंग्लंडचा पदार्पणवीर एलेक बेडसरला बाद केले होते.

एका मालिकेत चार सलामीवीर

ऑस्ट्रेलियाने 35 वर्षांत प्रथमच एका कसोटी मालिकेत चार सलामीवीरांना अंतिम अकरामध्ये संधी दिली. या मालिकेतील पहिल्या व दुसऱ्या कसोटीत जो बर्न्स व मॅथ्यू वेड ही सलामीची जोडी होती. मात्र तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर व विल पुकोव्हस्की जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. याआधी 1985-86मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने एकाच मालिकेत चार सलामीवीर खेळवले होते. त्या वेळी पर्थ कसोटीत अॅण्ड्रय़ू हिल्डीच व वॅपलर वेसेल्स जोडीने सलामी दिली होती. मात्र सिडनी कसोटीत रोबी केर व वेन फिलिप्स जोडीने डावाची सुरुवात केली होती.

गुलाबी रंगाची कसोटी

सिडनी कसोटीत हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया या उभय संघाच्या ड्रेसवर गुलाबी रंग आहे. 2009पासून सिडनीमध्ये वर्षातील पहिली कसोटी ही पिंक कसोटी म्हणून ओळखली जाते. या कसोटीत स्टम्प, ग्लोव्हज, बॅटची ग्रिप, कपडय़ांवरील लोगो, हार्ंडग, वॅप असं सर्व काही गुलाबी गुलाबी असतं. ही पिंक कसोटी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राची पत्नी जेन मॅग्रा हिच्याशी संबंधित आहे. जेन यांचे 2008मध्ये ब्रेस्ट पॅन्सरने निधन झाले होते. त्यामुळे ही कसोटी ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी पिंक कलरमध्ये खेळवली जाते. या पिंक कसोटीतील सर्व पैसा मॅग्रा फाऊंडेशनला मदतनिधी म्हणून दिला जातो.

पंतकडून दोन जीवदान

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विल पुकोव्हस्कीला यष्टिरक्षक रिषभ पंतने दोन वेळा जीवदान दिले. या जीवदानामुळे हिंदुस्थानची पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवण्याची संधी हुकली. रविचंद्रन अश्विनच्या 22व्या षटकात पंतने यष्टीमागे पुकोव्हस्कीचा सोपा झेल सोडला. त्या वेळी ऑसी फलंदाज 26 धावांवर होता. मोहम्मद सिराजच्या 25व्या षटकातही पंतने पुन्हा एकदा पुकोव्हस्कीचा 32 धावांवर झेल सोडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या या पदार्पणवीराचे झुंजार अर्धशतक झळकावले. शेवटी नवदीप सैनीने त्याला पायचित बाद केले. पुकोव्हस्कीने 110 चेंडूंत 4 चौकारांसह 62 धावांची खेळी केली.