
सामना ऑनलाईन, सिडनी
हिंदुस्थानी क्रिकेट संघाने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 अशा फरकाने धूळ चारली आणि गावसकर-बोर्डर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. टीम इंडियाने क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची करामत करून दाखवली. कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारा हिंदुस्थानी संघ आशियातील पहिलाच संघ ठरलाय हे विशेष. हिंदुस्थानच्या संस्मरणीय कामगिरीनंतर चोहोबाजूंनी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. दस्तुरखुद्द चॅम्पियन क्रिकेटपटूंनी देशभक्तिपर गाण्यांवर नाचून आपला आनंद व्यक्त केला. दरम्यान, सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशीही पावसाचा व्यत्यय आल्यामुळे ही कसोटी अनिर्णीत राहिली.
स्मिथ-वार्नर संघात नाही, मात्र त्यामुळे महत्त्व कमी नाही
स्टीवन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू बॉल टॅम्परिंग प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर एक वर्षाची बंदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ठोठावण्यात आलीय. यामध्ये हिंदुस्थानची चूक नाही. हिंदुस्थानने मेहनतीच्याच जोरावर ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले आहे असे स्पष्ट मत हिंदुस्थानचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यावेळी व्यक्त केले.
वर्ल्ड कप जेतेपदापेक्षा मोठा आनंद-विराट
हिंदुस्थानने 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. या संघात सीनियर खेळाडूंचा भरणा होता, मात्र विराट कोहलीचाही या संघात समावेश होता. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने त्या जेतेपदापेक्षा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजय माझ्या हृदयाजवळ असल्याचे भावुक उद्गार यावेळी काढले. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr यांनी या जेतेपदाची बरोबरी 1983 सालातील वर्ल्ड कप जेतेपदासोबत केली.
पराभूत करणारा पाचवाच देश
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच देशात धुव्वा उडवला. कांगारूंच्या देशात कसोटी मालिका जिंकणारा हिंदुस्थान हा पाचवा देश ठरला आहे. याआधी इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या देशांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवले आहे. आता या यादीत हिंदुस्थानचा समावेश झाला आहे. आशिया खंडातील हिंदुस्थान वगळता एकाही देशाने त्यांना कसोटी मालिकेत हरवलेले नाही.
मेरे देश की धरती अन् नागीण डान्स
भारत आर्मीने हिंदुस्थानच्या शिलेदारांचे हॉटेलमध्ये जंगी स्वागत केले. हिंदुस्थानी क्रिकेट संघाने हॉटेलमध्ये प्रवेश केला तेव्हा ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, ईशांत शर्मा, हार्दिक पांडय़ा यांच्यासह हिंदुस्थानी संघातील सर्वच खेळाडू हातामध्ये झेंडे घेऊन नाचताना दिसत होते. विराट कोहलीने नागीण डान्स करत आनंद व्यक्त केला. तसेच ‘मेरे देश की धरती…’ या गाण्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी भांगडा डान्सही केला.






























































