India vs Bangladesh अखेरच्या सामन्यात हिंदुस्थानची प्रतिष्ठा पणाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत हिंदुस्थानला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्याने हिंदुस्थानची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या अखेरच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानी संघ ‘व्हाइट वॉश’ची नामुष्की टाळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत हिंदुस्थानच्या दिग्गज खेळाडूंना साजेशी खेळी करता न आल्याने हिंदुस्थानला पराभवाची चव चाखावी लागली. पहिल्या दोन अटीतटीच्या सामन्यांमध्ये रोमहर्षक विजय मिळवून बांगलादेशच्या संघाचे मनोबल अधिक उंचावले आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून हिंदुस्थानला व्हाइट वॉश देण्याच्या इराद्याने बांगलादेशचा संघ मैदानावर उतरणार आहे. टीम इंडियाच्या प्रतिष्ठsच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असून, बांगलादेशचे तगडे आव्हान हिंदुस्थानपुढे असणार आहे.

दुखापत ठरणार डोकेदुखी

कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुसऱ्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्यांचे संघातील स्थान पक्के नाही. पहिल्या सामन्यात पदार्पण करणारा कुलदीप सेनही दुखापतीमुळे बाहेर गेलाय. अक्षर पटेलबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे दुखापत ही हिंदुस्थानी संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

सलामीला रोहितच्या जागी कोण?

दुखापतीमुळे रोहितच्या जागी सलामीला कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धवनची साथ द्यायला किशन आणि केएल राहुलपैकी एक जण मैदानात उतरेल. राहुल सलामीला आला तर मधल्या फळीत रजत पाटीदार किंवा राहुल त्रिपाठीपैकी एकाला संधी मिळू शकते.