
एजबॅस्टनमध्ये सुरू असलेला कसोटी सामना आता रंगात आला आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी चार विकेटची गरज आहे तर इंग्लंडला जिंकण्यासाठी 435 धावांची गरज आहे. लंच ब्रेकपूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने अशी काही चाल रचली की इंग्लंडचा कर्णधार टीम इंडियाच्या जाळ्यात सापडला.
आकाश दीपने दमदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या चार विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 83 धावांवर पाच अशी झाली होती. परंतु त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स (33) आणि जेमी स्मिथ (44*) यांनी संघाचा डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दोघांनी मिळून संघाला 150 पर्यंत पोहोचवलं. दोघांपैकी एकाची विकेट घेणं टीम इंडियासाठी गरजेचं होतं. त्यामुळे लंचपूर्वीचे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी रविंद्र जडेजावर सोपवण्यात आला. कर्णधाराशी त्याने काही मिनिटे चर्चा केली आणि आपलं षटक अवघ्या 100 सेकंदात संपवलं. त्यामुळे टीम इंडियाला आणखी एक षटक टाकण्याची संधी मिळाली. संधीचा फायदा घेत वॉशिंग्टन सुंदरवर जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याने अगदी योग्यरित्या टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत चाललेल्या बेन स्टोक्सला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे लंचपूर्वी इंग्लंडला बेन स्टोक्सच्या रुपात मोठा हादरा बसला.