
हिंदुस्थान-इंग्लंडमध्ये उद्यापासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची रेस लागणार आहे. दोन देशांमध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून चेन्नईत सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने या वर्षी जून महिन्यात लॉर्ड्स येथे होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट बुक केले असून आता दुसऱ्या स्थानासाठी हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात चुरस लागली आहे. या मालिकेत जो संघ चांगल्या फरकाने यश मिळवेल तोच संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरेल. याचप्रसंगी हिंदुस्थानात तब्बल दहा महिन्यांनंतर क्रिकेटचा धमाका तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. बघूया बहुप्रतीक्षित मालिकेत कोणता संघ वरचढ ठरतोय ते…

पाहुण्या संघाची 19 मालिकांमध्ये बाजी
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत 33 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. इंग्लंडने 19 कसोटी मालिका खिशात टाकल्या असून हिंदुस्थानी संघाने 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. दोन देशांमधील चार मालिका ड्रॉ राहिल्या आहेत.

रोहित, गिल, पंत खेळणार हे निश्चित
कर्णधार विराट कोहली याने पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा, शुभमन गिल व रिषभ पंत हे खेळतील हे निश्चित केले आहे. रोहित शर्मा व शुभमन गिल ही जोडी कसोटींत सलामीवीरांची भूमिका बजावेल, असे सांगत विराट कोहलीने मयांक अग्रवालला बाहेरच बसवण्यात येईल असे संकेत दिले. तसेच ब्रिस्बेन कसोटीत हिंदुस्थानला देदीप्यमान विजय मिळवून देणारा रिषभ पंत चेन्नईतील कसोटीत खेळेल असे स्पष्ट करीत रिद्धिमान साहाला बेंचवर बसावे लागेल याची चाहूल दिली.

मायदेशात पारडे जड
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये हिंदुस्थानात आतापर्यंत 60 कसोटी सामने पार पडले आहेत. हिंदुस्थानने यापैकी 19 कसोटींमध्ये विजय मिळवलाय. इंग्लंडने 13 कसोटी लढती जिंकल्या असून दोन देशांमधील 28 कसोटी सामने ड्रॉ राहिले आहेत. हिंदुस्थानात टीम इंडियाचे पारडे जड असले तरी दोन देशांमध्ये एकूण झालेल्या 122 कसोटींपैकी इंग्लंडने 47 कसोटी सामन्यांमध्ये ‘जय’ संपादन केलाय. हिंदुस्थानला मात्र 26 कसोटींमध्येच विजय मिळवता आला आहे. दोन देशांमधील 49 कसोटी ड्रॉ राहिल्या आहेत.
विजयी मालिका कायम ठेवण्याचे आव्हान
हिंदुस्थानी संघासमोर उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत मायदेशातील विजयी मालिका कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे. हिंदुस्थानने मायदेशात सलग 12 कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवले असून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 35 कसोटींपैकी एकाच कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हिंदुस्थानी संघाला मायदेशात 2012-13 साली कसोटी मालिका पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडनेच ही करामत करून दाखवली होती. त्यानंतर टीम इंडियाचा संघ मायदेशात हरलेला नाहीए.
आजपासून पहिली कसोटी
हिंदुस्थान-इंग्लंड, चेन्नई
सकाळी 9.30 वाजता




























































