बुमरा की बॅझबॉलचा थरार? पहिल्या कसोटीचा क्लायमॅक्स थरारक वळणावर; हिंदुस्थानला हव्यात 10 विकेट, तर इंग्लंडला 350 धावा

ऋषभ पंत आणि केएल राहुलच्या शतकांनी पहिल्या कसोटीचा क्लायमॅक्स थरारक वळणावर नेला. 4 बाद 333 अशा जबरदस्त स्थितीत असलेल्या हिंदुस्थानचा दुसरा डाव 364 धावांवर कोलमडला आणि इंग्लंडसमोर 400 धावांचे आव्हान उभारण्याचे हिंदुस्थानचे प्रयत्न अपयशी ठरले. इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर बिनबाद 21 धावा केल्या आहेत. आता कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विजयारंभ करण्यासाठी हिंदुस्थानला 10 विकेट टिपायच्या आहेत, तर इंग्लंडच्या फलंदाजांना 90 षटकांत 350 धावा करायच्या आहेत. विजयाचा पाठलाग करताना  हिंदुस्थानचा जसप्रीत बुमरा भेदक ठरतो, की इंग्लिश फलंदाजांच्या बॅझबॉलचे वादळ घोंगावतेय याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थानची पुन्हा घसरगुंडी

पंत आणि राहुलच्या शतकांमुळे हिंदुस्थान मजबूत स्थितीत होता. 400 धावांचा टप्पा गाठून दुसरा डाव घोषित करण्याचा विचार होता. पण 4 बाद 333 अशा स्थितीत असताना राहुल बाद झाला आणि हिंदुस्थानचा डाव क्षणात कोसळला. जॉश टंगने चार चेंडूंत शार्दुल ठाकूर (4), मोहम्मद सिराज (0) आणि जसप्रीत बुमरा (0) यांची विकेट काढल्यामुळे हिंदुस्थानची 9 बाद 349 अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर रवींद्र जाडेजाने 15 धावा केल्यामुळे हिंदुस्थानची मजल 364 पर्यंत पोहोचली आणि इंग्लंडपुढे 371 धावांचे आव्हान उभारले गेले.

हिंदुस्थानला विजयाची अधिक संधी

चौथ्या डावात 350 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणे कठीण ठरले आहे. इंग्लंडला षटकामागे 4 धावांची सरासरी राखायची असल्यामुळे ते आपल्या आवडत्या बॅझबॉल वृत्तीचा खेळ करून धावांचा पाठलाग करण्याचा धाडसी प्रयत्न करू शकतात. आव्हान मोठे असल्यामुळे हिंदुस्थानला विजयाची अधिक संधी आहे, मात्र इंग्लंडही मालिकेत 1-0 आघाडी घेण्यासाठी बॅझबॉल खेळ करणार यात वाद नाही.

हिंदुस्थानच्या विजयाची मदार बुमराच्या गोलंदाजीवर असल्यामुळे  त्याच्यावरही फार दबाव असणार. यात बुमरा सरस ठरतो की बॅझबॉल हे वेळच ठरवेल.

पंतचे विक्रमी शतक

पहिल्या डावात 134 धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतने कसोटीचा चौथा दिवसही संस्मरणीय केला. त्याने पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिलसह 209 धावांची भागी रचत हिंदुस्थानला 400 धावांचा टप्पा गाठून दिला होता, तर आज त्याने केएल राहुलच्या साथीने इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागी केली आणि हिंदुस्थानला त्रिशतकासमीप नेले. पंतने या डावातही घणाघाती शतक ठोकताना इंग्लंडच्या भूमीवर दोन्ही डावांत शतके झळकवणारा पहिलाच हिंदुस्थानी फलंदाज होण्याचा मान मिळवला. तसेच ऍण्डी फ्लॉवरनंतर दोन्ही डावांत शतकी किमया करणारा तो दुसराच यष्टिरक्षक. नेहमीच शतकी टप्पा चौकार आणि षटकाराने साजरा करणाऱ्या पंतला 95 ते 100 धावांचा टप्पा गाठण्यासाठी चक्क 21 चेंडू खेळावे लागले आणि त्याने पाचही एकेरी धावा काढत आपण असेही खेळू शकतो हे दाखवून दिले.

पहिल्या दोन्ही सत्रांत राहुलपंतचा दबदबा

गेल्या डावात शतक झळकवणाऱ्या शुभमन गिलकडून आजही मोठय़ा खेळीची अपेक्षा होती. पण कालच्या 6 धावांत अवघ्या दोन धावांची भर घातल्यानंतर त्याची यष्टी ब्रायडन कार्सने वाकवताच हिंदुस्थानींच्या काळजात चर्र झाले. दिवसाच्या सातव्याच चेंडूवर गिलची विकेट काढून इंग्लंडने सनसनाटी सुरुवात केली होती; पण राहुल आणि पंतने इंग्लंडचा हा जोश फार काळ टिकू दिला नाही. पहिल्या डावात 42 धावांवर बाद झालेल्या राहुलने पुन्हा एकदा संयमी खेळ दाखवत आपले इंग्लंड भूमीवरील शतकप्रेम पुन्हा एकदा साजरे केले. त्याने ओवल आणि लॉर्ड्सपाठोपाठ लीड्सवरही शतक झळकवले. हे त्याचे इंग्लंडमधील तिसरे, तर कारकीर्दीतील नववे शतक ठरले. त्यानंतर पंतनेही 130व्या चेंडूंवर आपले आठवे कसोटी शतक साकारले. नव्वदीत अडकलेल्या पंतने शतक पूर्ण होताच जोरदार फटकेबाजी करत 118 वर झेप घेतली, पण त्याची खेळी याच धावसंख्येवर संपली. त्याने या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकार लगावत  इंग्लिश गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले.