INDvsENG कर्णधार कोहली आणि निवड समितीमध्ये वादाची ठिणगी, ‘हे’ आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा एक संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाला 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची असून याची सुरुवात 4 ऑगस्टपासून होणार. तर दुसरीकडे श्रीलंकेमध्ये शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाला तीन एक दिवसीय आणि ती टी-20 लढतींची मालिका खेळायची असून याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. मात्र या मालिकांपूर्वी टीम इंडियामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) याला गंभीर दुखापत झाली आणि तो या मालिकेतून बाहेर फेकला गेला. शुभमन गिल याच्या जागी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना इंग्लंडला कसोटी खेळण्यासाठी पाठवावे अशी मागणी विराटसेनेने केली. मात्र या मागणीला निवड समितीने वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. त्यामुळे वादास सुरुवात झाली.

निवड समितीने शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्यास नकार दिला. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी टीम इंडियाकडे सक्षम संघ असल्याचे निवड समितीने म्हटले. टीम इंडियाकडे बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनचा (Abhimanyu Easwaran) पर्याय असून तो सलामीला खेळू शकतो, असे निवड समितीला वाटते. परंतु विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा त्याच्या खेळावर विश्वास नसल्याचेच दिसून येत असून यामुळेच त्यांनी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्याची रट्टा कायम ठेवला.

असा आहे हिंदुस्थानचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन (स्टँडबाय खेळाडू)

इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका

पहिली कसोटी – 4 ते 8 ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी – 12 ते 16 ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी – 25 ते 29 ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी – 2 ते 6 सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी – 10 ते 14 सप्टेंबर, मॅनचेस्टर