#INDvsNZ टीम इंडियाची ‘कसोटी’, फॉर्मात असणाऱ्या राहुलची उणीव भासणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाच्या संघाने न्यूझीलंड दौऱ्यात टी-20 मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवले. यानंतर एक दिवसीय मालिकेत यजमान संघान टीम इंडियाला व्हाईटवॉश दिला. आता विराट कोहलीच्या संघाला कसोटी मालिकेचे वेध लागले आहे. 21 फेब्रवारीपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. परंतु टीम इंडियासाठी ही मालिका सोपी असणार नाही, कारण एक दिवसीय मालिकेत यजमानांनी निर्भेळ यश मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. तसेच टी-20 आणि एक दिवसीय मालिकेत फॉर्मात असणारा के.एल. राहुल कसोटी खेळणार नसल्याने टीम इंडियाला त्याची उणीव नक्कीच भासणार आहे.

कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये के.एल. राहुलची वर्णी लागलेली नाही. विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत टीम इंडियाकडून सर्वाधिक चांगली फलंदाजी राहुलनेच केली आहे. टी-20 मध्ये सलामीवीर आणि एक दिवसीय मालिकेमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पाचव्या स्थानावर खेळताना राहुलने दमदाम कामगिरी केली. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत राहुलने 224, तर तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत 204 अशा एकूण 428 धावा राहुलने चोपल्या आहेत. मात्र कसोटीमध्ये तो खेळणार नसल्याने नवीन खेळाडूंचा ताळमेळ बसवण्याचे आव्हान विराटकडे असणार आहे.

ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर दमदार पुनरागमन
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात राहुलने खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला संघातील जागाही गमवावी लागली होती. परंतु लवकरच त्याच्यासाठी संघाचे दार उघडले गेले. संघात पुनरागमन केल्यानंतर सलामीवीर, मधल्या फळीत फलंदाजी, यष्टीरक्षक आणि आवश्यकता होती तेव्हा त्याने कर्णधाराची भूमिकाही बजावली.

रोहित-धवनही दुखापतीमुळे बाहेर
राहुलसह कसोटी क्रिकेटमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडीही दिसणार नाही. दुखापतीमुळे दोघे कसोटी मालिकेला मुकणार आहेत. त्यांच्या जागी पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांना संघात सलामीवीर म्हणून स्थान मिळाले आहे. परंतु एक दिवसीय मालिकेत शॉ आणि अग्रवाल ही जोडी फ्लॉप गेली होती. आता कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीचे आव्हान दोघांना आहे.