IND vs SA – टीम इंडियाचं सपशेल लोटांगण; गुवाहाटी कसोटी 408 धावांनी पराभव, आफ्रिकेनं 25 वर्षांनी जिंकली मालिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुवाहाटी कसोटीमध्ये हिंदुस्थानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानचा तब्बल 408 धावांनी दारूण पराभव केला. आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 549 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचे बॅटर 140 धावांमध्ये गारद झाले आणि आफ्रिकेने 25 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये मालिका विजय मिळवला. कोलकाता येथे झालेल्या कसोटीत आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला होता आणि आता गुवाहाटी कसोटीही खिशात घातल्याने आफ्रिकेने निर्भेळ यश मिळवले.

पहिल्या डावात 288 धावांची आघाडी घेतलेल्या आफ्रिकेने दुसरा डाव 5 बाद 260 धावांवर घोषित करत हिंदुस्थानसमोर विजयासाठी 549 धावांचा डोगर ठेवला होता. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच हिंदुस्थानच्या संघाची दमछाक झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत हिंदुस्थानचे सलामीवीर माघारी परतले होते. त्यानंतर पाचव्या दिवशी खांदे पडलेल्या हिंदुस्थानच्या संघाने हार्मरपुढे शरणागती पत्करली.

हार्मरच्या फिरकीत अडकून हिंदुस्थानचे 6 फलंदाज बाद झाले. केशव महाराजने त्याला उत्तम साथ देत 2 विकेट्स घेतल्या. मार्को यानसन आणि सेनुरम मुथुसामी याने प्रत्येकी एक विकेट घेतली. हिंदुस्थानचा संघ 63.5 षटकांमध्ये 140 धावांमध्ये बाद झाला. रवींद्र जाडेजा (54 धावा) वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मार्के यानसन याला प्लेअर ऑफ द मॅच आणि सिमॉन हार्मर याला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हार्मरने 2 कसोटीच्या 4 डावात 27 विकेट्स घेतल्या. 37 धावांत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.

बातमी अपडेट होत आहे…

कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव

धावांच्या बाबतीत कसोटी क्रिकेटमधील हा हिंदुस्थानचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने नागपूर कसोटी हिंदुस्थानचा 342 धावांनी पराभव केला होता. 2006 मध्ये पाकिस्तानने कराची कसोटी 341, 2007 ला ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत 337, 2017 ला ऑस्ट्रेलियाने पुणे कसोटीत 333 आणि 1996 ला दक्षिण आफ्रिकेने कोलकाता कसोटीत 329 धावांनी हिंदुस्थानचा पराभव केला होता.

घरच्या मैदानावर व्हाईट वॉश

0-2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2000)
0-3 विरुद्ध न्यूझीलंड (2024)
0-2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2025)

बावुमाचा विक्रम

पहिल्या 12 कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम तेंबा बावुमा याने केला आहे. त्याने 12 कसोटीत आफ्रिकेचे नेतृत्व केले असून 11 सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्याच्या खालोखाल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स असून त्याने 12 लढतीत संघाला 10 विजय मिळवून दिले होते, तर लिंडसे हॅसेट यांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या 12 कसोटी पैकी 10 सामने जिंकून दिले होते.