‘जेलर’साब!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘जे खळांची व्यंकटी सांडो’ हे माऊलींचे वचन शिरसावंद्य मानून रत्नागिरीचे जेलर अमेय पोतदार, तुरुंगातील बंद्यांना सन्मार्गाची वाट दाखवत आहेत. कमी वयात ते करत असलेली कामगिरी आणि `जेलर’ची प्रतिमा बदलण्याचा त्यांचा प्रयत्न कोकणवासीयांकडून वाखाणला जात आहे. काय घडते त्यांच्या जेलमध्ये, चला जाणून घेऊया.

प्रा. शिवाजीराव भोसले म्हणायचे, ‘माझ्या मुलाला चांगले शिक्षक मिळावेत असे प्रत्येकाला वाटते, परंतु माझा मुलगा शिकून चांगला शिक्षक व्हावा, असे कोणालाही वाटत नाही.’ ह्या विचारांनी प्रभावित झालेला एक तरुण आपल्या आईवडिलांप्रमाणे शिक्षकी पेशात उतरण्यासाठी डीएडचे शिक्षण घेऊ लागला. मात्र, त्याच्या हाताखाली केवळ शालेय विद्यार्थीच नाही, तर समाजातील वाट चुकलेले विद्यार्थीही घडावेत, अशी नियतीची योजना असावी. आणि तसेच घडलेही! नावापुढे प्राध्यापकाची पदवी लागण्याऐवजी जेलर ही पदवी लागली. ही कहाणी आहे मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि नोकरीनिमित्त कोकणवासी झालेले जेलर अमेय पोतदार यांची!

आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका, तर वडील प्राध्यापक. त्यामुळे अमेय यांचा कल शिक्षकी पेशाकडे वळला नसता, तरच नवल! मित्रपरिवार अभियांत्रिकीकडे वळत असताना अमेय यांनी समाज घडवण्यासाठी खारीचा वाटा म्हणून शिक्षक व्हायचे ठरवले. त्याच वेळेस ते राज्यशासित स्पर्धा परीक्षा आणि बँकिंगच्या परीक्षांचाही अभ्यास करत होते. डीएडबरोबरच, पदवीचाही अभ्यास सुरू होता. ही शैक्षणिक कसरत पाहून अनेकांनी `एक ना धड…’ म्हणत त्यांची थट्टा केली. मात्र, ते आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. याचे फलित म्हणून की काय, एकाच वेळी ते बँकिंग, शिक्षकी आणि पोलीस परीक्षा उत्तीर्ण झाले. पैकी शिक्षकी पेशात नोकरी उपलब्ध नव्हती. पण त्याच वेळेस त्यांना बँकेत आणि जेलमध्ये एकाच वेळी नोकरीसाठी बोलावणे आले. एकीकडे पांढरपेशी, चौकटबद्ध नोकरी, तर दुसरीकडे खडतर, रुक्ष प्रवास! तरीही त्यांनी निवड केली, `जेलर’ पदाची!

घरात पोलीस क्षेत्राची पार्श्वभूमी नसतानाही अमेय यांनी उचललेले पाऊल पुन्हा लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला. पोलीस खाते, गुन्हेगारांचा सहवास, जेल या सर्वाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर विपरीत परिणाम होईल, असे सर्वांचेच म्हणणे होते. परंतु, त्यांनी आपला निर्णय योग्य सिद्ध केला.

अमेय सांगतात, `चित्रपटात आणि वास्तवात `जेलर’ ही प्रतिमा क्रूर, तापट, कडक, कैद्यांवर जरब ठेवणारी अशीच असते. माझ्याबाबतीत तसे काहीच घडणार नव्हते. कारण, यातला एकही गुण माझ्या स्वभावात नव्हता. माझं ध्येय स्पष्ट होतं. माणसांच्या चांगुलपणावर माझा विश्वास होता, तो विश्वास कैद्यांमध्ये निर्माण करायचा होता. त्यासाठी वेगळे प्रयत्न केले नाहीत, तर एका जेलरने करावयाची कामे मी केली. कैद्यांची आत्मीयतेने विचारपूस केली. करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या घरच्यांची विचारपूस केली. रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक आर.आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाने भेटीगाठी घडवून आणल्या. (हा प्रयोग सर्वप्रथम येरवडा जेलमध्ये पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्ये ह्यांनी यशस्वीपणे केला होता.) समस्येवर तत्काळ उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. कैद्यांसाठी मनोरंजनाची फारशी साधने नव्हती. मोजकी वृत्तपत्रे आणि एक टीव्ही! त्यानंतर मी प्रत्येक बॅरॅकमध्ये टीव्ही आणला. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत घेतली. त्यामुळे रिकाम्या वेळेत जे वैâदी बाहेर फिरायचे, ते बॅरॅकमध्ये दिसू लागले. `स्वा. सावरकर समिती, दादर’ ह्यांच्याशी संपर्क करून १०० पुस्तकं मागितली, वाचनालय तयार केले. लेखन स्पर्धा आयोजित केली. त्यामुळे कैदी काय वाचतात, काय आत्मसात करतात, हे कळलं. ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे कैद्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल!’

अमेय यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे कैदी त्यांच्या एवढ्या प्रेमात पडले आहेत, की उद्या त्यांची अन्य कुठे बदली झाली, तर आपणही तिथे जाऊन आपला कारावास पूर्ण करू, असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडेल, अशा रीतीने कैद्यांची कोणी काळजी घेणारे असेल, तर गुन्हेगार कैदेत राहणे पसंत करतील आणि त्यांची संख्याही वाढेल. याबाबत विचारले असता अमेय सांगतात, `बंदी दोन प्रकारचे असतात. न्यायाधीन बंदी आणि शिक्षाबंदी. माझ्या ताब्यात न्यायाधीन बंदी आहेत. म्हणजे ज्या बंदींवर अजूनपर्यंत गुन्हा सिद्ध झालेला नाही, म्हणून वैâदेत आहेत, अशा व्यक्ती. त्यांच्यापैकी ५० टक्के शक्यता कैदी गुन्हेगार असतील, तर ५० टक्के शक्यता नसतीलही! हे सिद्ध होईपर्यंत ते तुमच्या आमच्यासारखेच सामान्य नागरिक आहेत. मग ते केवळ कैदेत आहेत म्हणून त्यांच्याशी कठोरपणे वागणे मला योग्य वाटत नाही.

‘कैदेत राहिलेला मनुष्य, जर निर्दोष असेल, तर तो तुरुंगाबाहेर पडल्यावर समाजव्यवस्थेवर प्रश्न उठवू लागतो. समाजावर राग काढू लागतो. एखादी कार्यक्षम व्यक्तीदेखील अकार्यक्षम बनू शकते. म्हणून कैदकाळात त्यांना सक्रीय ठेवणे, चांगल्या कामासाठी उत्तेजन देणे आणि निरोगी वातावरण निर्माण करणे मला गरजेचे वाटले. म्हणून कैद्यांचे मानसिक आरोग्य जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या कैद्यांना मी नेहमी सांगतो, `जास्त बंदीसंख्या सांभाळणे हे जेलरसाठी प्रतिष्ठेचे लक्षण असले, तरी चांगल्या समाज व्यवस्थेचे लक्षण नाही. तुम्ही लवकरात लवकर आपली शिक्षा संपवून चांगले नागरिक बना आणि आपल्या कुटुंबियांसोबत चांगले आयुष्य व्यतित करा. तसे घडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असते, ते काम मी करतो.’

अमेय यांच्यासारखा तरुण तडफदार जेलर आपल्या अधिकारात राहून चांगले बदल करू पाहतोय, या गोष्टीचे त्यांच्या वरिष्ठांनी नेहमी स्वागत केले आणि प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना देशमुख सर, स्वाती साठे मॅडम, भूषणकुमार उपाध्ये सर, राजवर्धन सर यांची नावे ते आवर्जून घेतात.

अमेय यांनी आपल्या अखत्यारीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अन्यही अनेक उपक्रम राबवले. जसे की,
► सरकारी मालकीच्या मोकळ्या जागेत वैâद्यांकडून श्रमदानातून शेती करवून घेतली. कैद्यांच्या कष्टातून पिकवलेला भाजीपाला कैद्यांसाठी वापरून उरलेल्या मालाची विक्री केली. त्यातून सरकारला दरदिवशी ५००० रुपयांचे उत्पन्न मिळू लागले.
► दीपज्योती अंधशाळेतील विद्यार्थ्यांकडून तुरुंगाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करवून घेतला. दृष्टिहीन विद्यार्थ्यांकडून दृष्टी असलेल्या कैद्यांना समाजभानाची दृष्टी देणे, हा त्यामागचा हेतू होता.
► कैद्यांचे नाव, पत्ता,फिंगरप्रिंट, गुन्ह्याची पार्श्वभूमी अशा तपशिलासहित माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केली. येरवाडा तुरुंगापाठोपाठ गुन्हेगारांची अद्ययावत माहिती ठेवणारे रत्नागिरीचे तुरुंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
► अनेक ठिकाणी असलेला टेलिमेडीसीन उपक्रम तुरुंगासाठी राबवला. त्यामुळे शासकीय हॉस्पिटलशी बोलून कैद्यांना लागणारी औषधे फोनवर मागवून घेणे, तसेच त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार करणे सोयीचे झाले.
► सर्वात महत्त्वाचे म्हणजे रत्नागिरीतील स्वा. सावरकरांचे वास्तव्य असलेली दुर्लक्षित कोठडी डागडुजी करून अत्याधुनिक सेवांनी युक्त करवून घेतली. तिथे आता १०० जणांची आसनव्यवस्था आहे, प्रोजेक्टर आहे, सावरकरांचे साहित्य आहे, त्यांच्या हस्तलिखित ग्रंथांच्या दोन प्रति आहेत. विविध शाळा तिथे भेट देतात. लघुपट दाखवले जातात, मोठ्या प्रमाणात हे सावरकरांचे `कारातीर्थ’ डेव्हलप झाले आहे. शिवाय पर्यटनाचा एक भाग झाले आहे. वर्षाकाठी ४००० लोक `कारातीर्थ’ला भेट देतात.

लहान वयात एवढी मोठी कामगिरी बजावूनही जेलर अमेय सर्वसामान्यांना आपलेसे वाटतात, आपल्यातले वाटतात. याचे गुपित ते सांगतात, `जेलरचे प्रशिक्षण घेत असताना आम्हाला शिकवण दिलेली असते, `तुम्ही जेलमध्ये जाता तेव्हा जेलर म्हणून जा, बाहेर पडताना सामान्य माणूस म्हणून बाहेर पडा. तरच तुमचे वैयक्तिक आयुष्य बिघडणार नाही. त्यामुळे ड्युटी संपली की मित्रांबरोबर आऊटिंग, लहान मुलांबरोबर खेळ, घरच्यांबरोबर गप्पा असं सर्वसामान्यांसारखं आयुष्य मी जगतो.’

`जेलर’ ह्या घटकाबद्दल समाजात विशेष बोलले जात नाही. त्यांच्याबद्दल लोकांना विशेष माहितीही नसते. मात्र, जेलर अमेय यांचे कर्तृत्व आणि रुबाब पाहून तरुणांमध्ये जेलर पदाबाबत उत्सुकता वाढली आहे. आपणही समाजव्यवस्थेचा भाग व्हावे, समाजासाठी चांगले कार्य करावे आणि समाजाचा सर्वतोपरी उत्कर्ष करावा, ही जाणीव तरुणांना होऊ लागली आहे. त्यादृष्टीने ती स्पर्धा परीक्षा, पोलीस परीक्षांचा अभ्यास करत आहेत. परिणामी, असा सगळा सकारात्मक बदल पाहून जेलर अमेय पोतदार ह्यांच्या मनात लपलेला शिक्षक सुखावत आहे.