
हिंदुस्थान आणि अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाची केवळ लागण झालेले रुग्ण सापडत असताना आता या व्हायरसमुळे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एकाचा तर हिंदुस्थानच्या कोचीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिका आणि हिंदुस्थानमधील केंद्रीय आरोग्य खाती अधिक सतर्क झाली आहेत.
मलेशियाच्या सुपरमार्केटमध्ये काम करणारा 36 वर्षीचा पुरुष गेल्या गुरुवारी केरळमध्ये परतला. तो केरळच्या पेन्नूरमध्ये राहणारा होता. विमानतळावर तपासणीवेळी त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याला एर्नाकुलमच्या सरकारी महाविद्यालयाच्या आयसोलेटेड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय चाचणीनंतर त्याचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, शुक्रवारी उशिरा रात्री त्याचा अचानक मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे याची खातरजमा करण्यासाठी त्याच्या रक्ताचा दुसरा नमुना पुण्यातील एनआयव्हीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसने अमेरिकेतही शिरकाव केला असून या व्हायरसने शनिवारी वॉशिंग्टनमधील एका महिलेचा बळी घेतला. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. अमेरिकेत कोरोनाने शिरकाव केला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रतिबंधक उपाययोजना आखण्यात आली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, इराणमधून अमेरिकेत येणाऱयांना बंदी घालण्यात आली असून दक्षिण कोरिया आणि इटलीतील काही शहरांमध्ये जाऊ नये, असा खबरदारीचा सल्ला अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना दिला आहे.
























































