India Pakistan Ceasefire – हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला, परराष्ट्र मंत्रालयाची शस्त्रसंधीची घोषणा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे, अशी माहिती हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे.

या संदर्भात माहिती देताना विक्रम मिस्री म्हणाले आहेत की, आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील, असे मिस्री म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल ‘ट्रुथ सोशल’ एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की हिंदुस्थान आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन.”