ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला पुन्हा हरविले, दुस्थान विजयासह चौथ्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत सलग दुसऱया सामन्यात हरविण्याचा पराक्रम केला. पहिला सामना पेनल्टी शूट आऊटमध्ये जिंकणाऱया हिंदुस्थानने दुसऱया लढतीत यजमान संघाचा 3-0 गोल फरकाने धुव्वा उडविला. या विजयासह हिंदुस्थानने 15 गुणांची कमाई करीत गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.

पहिल्या विजयाचा हीरो ठरलेल्या हरमनप्रीत सिंगने दुसऱया लढतीतही 11व्या मिनिटालाच हिंदुस्थानचे खाते उघडले. ललित उपाध्यायने 25व्या आणि मनदीप सिंगने 58व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानला एकतर्फी विजय मिळवून दिला. टोकियो ऑलिम्पकमध्ये हिंदुस्थानसह, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, स्पेन, न्यूझीलंड व यजमान जपान हे संघ ‘अ’ गटात आहेत.

हिंदुस्थानचा नव्या दमाचा गोलरक्षक किशन बहादूर पाठकच्या अभेद्य कामगिरीमुळे अर्जेंटिनाची आघाडीची फळी अक्षरशः नामोहरम झाली. हरमनप्रीतने पेनल्टी काॅर्नरवर पहिला गोल करून अर्जेंटिनाला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर ललितने मैदानी गोल करीन हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी वाढविली. या आघाडीनंतर हिंदुस्थानी खेळाडूंचा उत्साह दुणावला, तर यजमान संघाची दडपणात कामगिरी खालावली. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना मनदीपने तिसरा गोल केला, अन् हिंदुस्थानने रुबाबदार विजय संपादन केला. गोलपोस्टपुढे अभेद्य कामगिरी करणारा हिंदुस्थानचा गोलरक्षक किशन बहादूर पाठक या सामन्याचा मानकरी ठरला. आता हिंदुस्थान व अर्जेंटिना यांच्यात दोन मैत्रीपूर्ण लढती होणार असून त्यानंतर 8 व 9 मे या कालावधीत हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यात प्रो लीगच्या पुढील टप्प्यातील लढती होतील.

”अर्जेंटिनासारख्या बलाढय़ संघाविरुद्धचा 3-0 फरकाने मिळालेला विजय नक्कीच सुखावणारा आहे. प्रतिस्पर्धी संघाचा मी एकही गोल होऊ दिला नाही, त्यामुळे मनोबल उंचावले आहे. आमच्या मधल्या आणि आघाडीच्या फळीने योग्य ताळमेळ राखत खेळ केल्याने हिंदुस्थानला मोठा विजय संपादन करता आला.” – किशन बहादूर पाठक