ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचे पतंग कापले,वानखेडेवर कांगारूंचा महाविजय

680

जयेंद्र लोंढे

टीम इंडियाच्या एकापेक्षा एक अशा नावाजलेल्या फलंदाजांची हाराकिरी… निष्प्रभ ठरलेले गोलंदाज… अन् क्रिकेटच्या सर्वच बाबतींत पाहुण्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी केलेली अव्वल दर्जाची कामगिरी…  ही स्टोरी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या वर्षातील हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या वन डे लढतीची. वानखेडे स्टेडियमवर दोन दिवसांपासून कसून सराव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने मंगळवारी हिंदुस्थानचा 10 गडी राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. डेव्हिड वॉर्नर (नाबाद 128 धावा) व ऍरोन फिंच (नाबाद 110 धावा) यांचा शतकी झंझावात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरला. मकर संक्रांतीच्या आदल्याच दिवशी कांगारूंनी हिंदुस्थानचे पतंग कापले हे विशेष!

258 धावांची अभेद्य भागीदारी

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 256 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजयी लक्ष्य ओलांडले. कर्णधार ऍरोन फिंच व अनुभवी डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने 258 धावांची अभेद्य भागीदारी रचत कांगारूंच्या ‘महाविजया’वर शिक्कामोर्तब केले. ऍरोन फिंचने 16वे शतक झळकवताना दोन गगनभेदी षटकार व 13 दमदार चौकार चोपून काढले. त्याने नाबाद 110 धावांची खेळी साकारली. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 128 धावांच्या खेळीला तीन षटकार व 17  चौकारांचा साज होता. हे त्याचे 18वे शतक ठरले.

दृष्टिक्षेपात

  • मिचेल स्टार्क 2010 सालानंतर वानखेडेवर वन डे सामना खेळला.
  • ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपनंतर पहिला वन डे सामना खेळला.
  • वॉर्नर, फिंचने वानखेडे स्टेडियमवरील सर्वोत्तम भागीदारी नोंदवली.
  • वॉर्नरने मार्क वॉच्या 18 शतकांची बरोबरी केली.
  • याआधी मार्श-बुन, कर्स्टन-गिब्ज, हाफिज-जमशेद, थरंगा- जयवर्धने, डी. कॉक- अमला या जोडीने हिंदुस्थानविरुद्ध शतक झळकवले होते.
आपली प्रतिक्रिया द्या