ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया खेळणार डे-नाईट कसोटी सामने

589

यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 विश्वचषक हे टीम इंडियापुढचे प्रमुख आव्हान असेल. या स्पर्धेनंतर हिंदुस्थानी क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातच वन-डे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी थांबणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया परदेशातला आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयमधील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. या वर्षाच्या अखेरीस हिंदुस्थानी संघ ऑस्टेलिया दौऱ्यावर असेल.

2019 या वर्षात हिंदुस्थानी क्रिकेट संघ कोलकात्यात इडन गार्डन्स मैदानावर बांगलादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. हा सामना जिंकत हिंदुस्थानने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. मात्र ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर गुलाबी चेंडूवर खेळणे हे नेहमी आव्हानात्मक असते. हिंदुस्थान -ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे-नाईट कसोटीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही काळात याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. याप्रकरणी बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चाही झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उभय देशाच्या क्रिकेटशौकिनांना प्रतीक्षा आहे ती बोर्डाकडून अशा लढतीच्या अंतिम घोषणेची.

आपली प्रतिक्रिया द्या