
गोल्ड कोस्टवर सूर्य मावळत होता, पण ऑस्ट्रेलियाचा सूर तर चौथ्या टी-20 सामन्यातच मावळला! हिंदुस्थानने केवळ 167 धावा केल्या आणि तेवढय़ाच संख्येवर काय होईल? असं वाटत असतानाच अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीचे जाळे असे लावले की, कांगारूंना धावफलकच सापडेनासा झाला. 48 धावांनी झालेला विजय हा हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलियातला सर्वात मोठा टी-20 विजय ठरला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळाली.
168 धावांचं लक्ष्य म्हणजे थोडंफार मारलं तर जमेल अशी भावना घेऊन आलेल्या कांगारूंना हिंदुस्थानी फिरकीपटूंनी थोडंफार फिरवलं आणि बाकीचं काम शिवम दुबेनं हळूवार हाताने केलं. नाणेफेकीच्या वेळी सूर्यपुमार यादव म्हणाला होता की, खेळपट्टी उपखंडीय आहे. तो फक्त शब्द नव्हता, तो इशारा होता.
अक्षरची जादू आणि
ऑस्ट्रेलियाची घसरण
पहिल्या तीन सामन्यांत फारसा गाजावाजा न करणारा अक्षर पटेल इथे आला आणि त्याच्या बोटांमधून नुसता चेंडू नाही, तर भ्रमाचा भुंगा निघत होता. मॅथ्यू शॉर्ट स्वीप करण्याच्या मोहात पायचीत झाला आणि जोश इंग्लिसचा ऑफ स्टंप अक्षरच्या जलद फिरकीने उडवला. पंचांनी सुरुवातीला नकार दिला होता, पण रिह्यूने सत्य उघडलं. कांगारूंच्या डोक्यावर पहिला झटका बसला.
दुबेची दुहेरी ठोसेबाजी
शिवम दुबे या खेळाडूचं नाव ऐकलं की, सौम्य गोलंदाजी आठवते, पण गोल्ड कोस्टवर त्यानं स्लोअर शॉक दिला. मिचेल मार्श चांगला रंगात आला होता तेव्हा दुबेनं त्याला अर्शदीपकडून झेलबाद केले. पुढच्याच क्षणी टिम डेविडने दुबेला षटकार ठोकला आणि दुबेनं हसत म्हणलं, थांब रे, आता बघ. पुढच्याच चेंडूवर डेविड पूल करताना सूर्यपुमारकडे झेल देऊन निघून गेला. हा झेल म्हणजे ‘गोलंदाजाच्या बदला’चा मास्टरक्लास! अर्शदीपनं फिलिपलाही झेलबाद करून धावफलकावर शंभरी झळकण्याआधीच अर्धा संघ तंबूत पाठवला.
वॉशिंग्टनचं बुद्धीचं वादळ
ऑस्ट्रेलिया अर्धा संघ 98 धावांत ढासळल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल हा शेवटचा आशेचा किरण होता. पण वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला आणि प्रकाशच गेला! मग वॉशिंग्टन सुंदरने आपली ‘स्वच्छता मोहीम’ सुरू केली. मार्पस स्टॉयनिस पायचीत, आणि पुढच्याच चेंडूवर झेव्हियर बार्टलेटचे स्टंप पाडले. दोन चेंडूंत दोन विकेट्स म्हणजे गोल्ड कोस्टवर ‘सुंदर चक्रीवादळ.’
शेवटी जसप्रीत बुमराने बेन ड्वारशुईसचा त्रिफळा उडवून काम संपवलं आणि वॉशिंग्टनने झम्पाला झेलबाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्ण केला. हिंदुस्थानकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स, अक्षर पटेल आणि दुबे यांनी 2-2, तर अर्शदीप, चक्रवर्ती आणि बुमराने 1-1 विकेट घेतली.
फिरकीच्या पाठीशी ठाम फलंदाजी
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी दिलेली 56 धावांची सलामी हिंदुस्थानसाठी सोन्याहून पिवळी ठरली. शुभमन गिलचं 46 धावांचं संयमी, पण स्मार्ट इनिंग म्हणजे जणू ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर दिलेली ‘शिस्तीची शिकवण.’ शिवम दुबे आणि सूर्यपुमार यादव यांनी काही चमकदार फटके मारले, पण मधल्या फळीत झम्पाने तिलक वर्मा आणि जितेश शर्माला बाद करून गती कमी केली. शेवटी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शेवटच्या काही षटकांत मिळवलेल्या धावा त्या धावांनीच पुढचं चित्र रंगवलं.



























































