
सामना ऑनलाईन ,कौलालंपूर
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने गुरुवारी येथे झालेल्या महत्त्वाच्या लढतीत श्रीलंकेचा ७ गडी व ७ चेंडू राखून धुव्वा उडवला आणि आशियाई ट्वेण्टी-२० क्रिकेट स्पर्धेत सहा गुणांनिशी अव्वल स्थानावर झेप घेतली. तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे आपले आव्हानही कायम ठेवले. हिंदुस्थानची दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजने यावेळी ट्वेण्टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पा ओलांडत हिंदुस्थानी पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले. ट्वेण्टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पा ओलांडणारी ती हिंदुस्थानची पहिलीच क्रिकेटपटू ठरली हे विशेष.
श्रीलंकेकडून मिळालेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सलामीवीर मिताली राज (२३), स्मृती मंधाना (१२) यांनी १२ व्या षटकांत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. या दोन्ही बाद झाल्यावर कर्णधार हरमानप्रीत कौरने २५ चेंडूंत २४ धावा करून आपले योगदान दिले. संघाच्या ७० धावा झाल्यानंतर हरमानप्रीत माघारी परतली. त्यानंतर वेदा कृष्णमूर्ती (२९) आणि अनुजा पाटील (१९) यांनी ३२ चेंडूंत केलेल्या नाबाद ४० धावांच्या भागीदारीने ७ चेंडू शिल्लक असताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, याआधी श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिष्ट, अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी, ऑफस्पिनर अनुजा पाटील, पूनम यादव यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने श्रीलंकेला १०७ धावांपर्यंतच रोखले. एकता बिष्टने २० धावा देत २ फलंदाज बाद केले. दरम्यान, अन्य लढतींमध्ये बांगलादेशने थायलंडला आणि पाकिस्तानने मलेशियाला नमवताना आपल्या खेळाची चुणूक दाखवली.
यावर एक नजर
मिताली राजने आशियाई ट्वेण्टी-२० क्रिकेट स्पर्धेत दोन हजार धावांचा टप्पा ओलांडला. तिने टी-२० क्रिकेटमधील ७४ सामन्यांमध्ये १४ अर्धशतकांच्या जोरावर अन् ३८.०१ च्या सरासरीने २०१५ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये नाबाद ७६ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. अशी कामगिरी करणारी मिताली क्रिकेटविश्वातील सातवी महिला आहे. महिलांमध्ये पहिल्या तीन स्थानी चार्लोट एडवर्डस् (२,६०५), त्यानंतर स्टॅफनी टेलर (२,५८२) आणि सुझी बेटस् (२,५१५) यांचा क्रमांक लागतो. पुरुष टी-२० मध्ये अग्रस्थानी मार्टिन गप्टील (२२७१) व त्यानंतर ब्रॅण्डन मॅक्युलम (२१४०) आणि विराट कोहली (१९८३) यांचा क्रमांक लागतो.


























































