
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या (SIR) मुद्द्यावरून लोकसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ घातल्याने संसदेचे कामकाज मंगळवारी, 22 जुलै 2025 रोजी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दुपारी दोन वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांचे खासदार हातात फलक घेऊन सभागृहाच्या मध्यभागी आले आणि जोरदार घोषणाबाजी करू लागले. बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीविरोधात त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी आसनावर उपस्थित सभापती दिलीप सैकिया यांनी विरोधी खासदारांना शांतता राखून आपल्या जागेवर बसण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याची संधी देण्याचे आश्वासनही दिले. मात्र विरोधी पक्षांनी यावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर सभापतींनी लोकसभेचे कामकाज बुधवार, 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली.
इंडिया आघाडीतील पक्षांनी बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीला लोकशाहीविरोधी कृती ठरवत सरकारवर टीकास्त्र सोडले. इंडिया आघाडीच्या खासदारांनी आरोप केला आहे की, हा प्रयत्न मतदारांचे हक्क हिसकावण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेला बाधा आणण्याचा आहे. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, हा मुद्दा पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.