इस्रायल-इराण संघर्ष, केंद्र सरकारने उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान सरकारने पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संकटावर सर्व पक्षांचे मत जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आवाहन केले आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

ही सर्वपक्षीय बैठक उद्या, 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार असून, पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

इस्रायल–इराण संघर्षाचा प्रत्यक्ष परिणाम हिंदुस्थानच्या ऊर्जा क्षेत्रावर दिसून आला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. काही भागांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खर्चात भर पडली आहे. तसेच इंधन दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढून त्याचा परिणाम किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही झाला आहे.

याचबरोबर आयात-निर्यात क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. आखाती प्रदेशातील तणावामुळे काही शिपिंग मार्गांवर विलंब झाला असून, मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी निर्यातदारांना जास्त खर्च सहन करावा लागत आहे, तर आयातीतही काही वस्तूंचा पुरवठा उशिरा होत आहे. विशेषतः पेट्रोकेमिकल्स आणि ऊर्जा संबंधित वस्तूंमध्ये दरवाढ आणि पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.