
लडाख सीमेवर हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमने-सामने असल्याने सीमारेषेवर तणाव आहे. त्यातच चीनने आता लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमाभागाजवळील लष्करी हवाई तळावर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने तैनात केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यात बॉम्बचा मारा करणारी विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टर यांचाही समावेश आहे. दोन्ही देशातील वाढता तणाव कमी करण्यासाठी लडाखमध्ये बैठकाही होत आहेत.
चीनने हिंदुस्थानच्या सीमेजवळील होटान,नग्यारी,शिगात्से आणि नयिंगची या चार लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणाच लढाऊ विमाने तैनात केल्यानंतर हिंदुस्थाननेही लेहमध्ये मिग 29 आणि अपाचे हेलिकॉप्टर तैनात केली आहे. चीनने पेगाँग सरोवराच्या परिसरात घुसखोरी केली असून या भागात हिंदुस्थानी जवानांनी गस्तीपासून रोखण्यासाठी सैनिकांची कुमक वाढवली आहेत. तसेच सीमाभागात चीनच्या सैनिकांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चीनने लष्करी तळांवर लढाऊ विमाने तैनात करण्यासह गोगरा हॉस्पॉटजवळील तळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमवून ठेवला आहे. चीनच्या या हालचालींमुळे हिंदुस्थानच्या देपसांग, मुर्गो,गलवान, हॉटस्प्रिंग, कोयूल,फूकचे आणि देमचोक या भागांतील धोका वाढला आहे. चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवत हिंदुस्थाननेही जवानांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बैठकाही सुरू आहेत.




























































