
लडाख सीमेवर घुसखोर चिनी सैनिकांबरोबर पुन्हा जोरदार धुमश्चक्री घडली असून त्यात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला आहे तर एकजण जखमी आहे.दरम्यान तीन दिवसांत 3 वेळा लाल माकडांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. हिंदुस्थानी जवानांनी हा प्रयन हाणून पाडला आहे. सीमेवर प्रचंड तणाव आहे.
शहीद जवान हा तिबेटी वंशाचा असून तो स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये (एसएफएफ) तैनात होता. याबाबत विदेशी मीडियाने वृत्त दिले आहे. हिंदुस्थानी लष्कराने अधिकृत दुजोरा अद्याप दिलेला नाही. चिनी सैन्याने दुजोरा दिलेला नाही. तिबेट संसदेचे निर्वासित सदस्य नामग्याल डोलकर लधियारी यांच्या हवाल्याने ‘एएफपी’ ने वृत्त दिले आहे. 29-30च्या रात्री पँगॉग लेक परिसरात चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. ही घुसखोरी हिंदुस्थानी जवानांनी रोखली. यावेळी जोरदार धूमचक्री झडली. यात एक जवान शहीद झाले तर एक जवान जखमी आहे. त्यानंतरही चिनी सैन्याकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. 31 ऑगस्टला प्रयत्न झाला. मंगळवारी पुन्हा चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करीत होते. तीन दिवसांत तीन वेळा लाल माकडांचा हा प्रयत्न हिंदुस्थानच्या जवानांनी हाणून पाडल्याचे वृत्त आहे.
5 जूनला झाला होता मोठा हिंसक संघर्ष
लडाखच्या गलवान खोऱयात चिनी सैन्याच्या घुसखोरीमुळे हिंसक संघर्ष झाला. यात कर्नल संतोषबाबू यांच्यासह हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचे 43 सैनिकांचा मृत्यू झाला. मात्र अद्याप चीनने दुजोरा दिलेला नाही. 5 जूननंतर पुन्हा 29-30 ऑगस्टला हिंसक संघर्ष झाला आहे.
5 जूननंतर अनेक वेळा राजनैतिक आणि लष्करी पातळीवर हिंदुस्थान आणि चीनमध्ये चर्चा झाल्या. मात्र चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत.
अरुणाचल प्रदेश सीमेवर जवानांची संख्या वाढविली
अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर हिंदुस्थानी लष्कराने जवानांची तैनाती वाढविली आहे. गलवान खोऱयातील संघर्षानंतर अरुणाचल सीमेवर चीनकडून कुरापतींचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अरुणाचलच्या अंजक जिल्ह्यात लष्कराच्या हलचाली वाढल्या आहेत. लष्कराच्या अनेक बटालियन येथे तैनात केल्या आहेत.
पाकडय़ांच्या गोळीबारात अधिकारी शहीद
पाकिस्तानी रेंजर्संनी जम्मू-कश्मीरच्या राजौरी भागातील केरी सेक्टरवर पुन्हा युद्धबंदी मोडली. या गोळीबारात हिंदुस्थानी लष्कराचा एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी शहीद झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्कराने एलओसीवरील चौकीवर गोळीबार करून युद्धबंदी मोडण्याचा हा गेल्या चार दिवसांतील दुसरा प्रकार आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी 30 ऑगस्टला नौशेरा सेक्टरवरील चौकीवर केलेल्या गोळीबारातही हिंदुस्थानी लष्कराचा आणखी एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी शहीद झाला होता.































































